करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम लागु झाल्यास करमाळा मतदार संघातील सरफडोह येथील जमीनीचा प्रश्न निकालात निघून शेतकऱ्यांना फायदा होणार असेल तर या विधेयकास आपला पाठींबा असणार आहे अशी सुचक प्रतिक्रिया करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे. जुन महिन्यात राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार असुन या अधिवेशनात मतदार संघातील प्रलंबित प्रश्न तारांकित अथवा लक्षवेधी स्वरुपात

मांडण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने धार्मिक संस्थांच्या मालकीच्या सुमारे साडेचार लाख हेक्टरपेक्षा जास्त ‘देवस्थान इनाम जमिनी’ कसणाऱ्या कुळांच्या व पुजाऱ्यांच्या नावावर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६ आणला जात असून, ५ जून २०२६ पर्यंत या मसुद्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत, त्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे. करमाळा

तालुक्यातील सरफडोह येथील शेतजमिनी ह्या अद्यापही शेतकऱ्यांना पुर्ण हक्काने मिळाल्या नाहीत. याबाबत शेतकऱ्यांकडे मालकी हक्काचे शासननोंदीचे सबळ पुरावे आहेत. परंतु या जमिनी देवस्थानच्या असल्याने याची नोंद संबधित विभागाकडून बदलण्यात आली. केवळ तालूकास्तरावरील शेरा बदलामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले. यानंतर त्यांना शासनाच्या विविध योजनांचा व कर्ज प्रकरणाचा लाभ मिळणे बंद झाले आहे. यामुळे आपण सन २०१४ ते २०१९ मध्येही हा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर अनेक बैठका घेतल्या. अनेकवेळा जिल्हाधिकारी यांना भेटुन समस्या मांडल्या. परंतु हा प्रश्न अजुन

तसाच कायम असल्याने आता जर महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम येणार असेल आणि यातुन जर माझ्या करमाळा तालुक्यातील सरफडोह येथील ग्रामस्थांना न्याय मिळणार असेल तर या विधेयकास आपला पुर्ण पाठींबा असणार आहे असे सुचक मत आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले. आता आमदार कार्यालयाकडून सरफडोह येथील शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाशी बोलणे चालू असून जमिन मालकी हक्काचे पुरावे व इतर महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम नेमका काय असेल व याचा मसुदा कसा असेल याचा अंदाज घेण्यासाठी आमदार कार्यालयात गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनात सरफडोह येथील प्रश्न मांडण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील हे आग्रही असल्याने त्या अनुषंगाने पुढील नियोजन सुरू झाले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *