
करमाळा प्रतिनिधी
खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीची सर्व पदे बरखास्त केल्यानंतर आता जिल्ह्यात नव्याने फेररचना सुरू झाली आहे. ज्यांचे पक्षात प्रामाणिक कार्य आहे, त्यांनाच संधी देण्याच्या धोरणानुसार करमाळ्याचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांची करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून हे नियुक्ती पत्र प्रसिद्ध करण्यात आले.

विशाल गायकवाड यांनी युवा सेनेचा एक सामान्य ‘युवा सैनिक’ म्हणून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. त्यांच्या कार्याची तळमळ पाहून पक्षाने त्यांच्यावर गेल्या १० वर्षांपासून शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. या काळात त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी मानले जाते.

गायकवाड यांच्या कार्याचा आढावा पाहिला तर सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसून येतो. तसेच गोरगरीबांची शासकीय कार्यालयात अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी नेहमीच लढा दिला आहे. विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी, जागतिक महिला दिनासारखे कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली असून विविध वार्डात युवा सेनेच्या शाखा उघडून पक्ष संघटना बळकट केली आहे. याच कार्याची दखल घेत शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांच्यावर आता विधानसभा संपर्क प्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

निवडीनंतर विशाल गायकवाड म्हणाले की, “मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर निष्ठा ठेवून पक्षात कार्यरत झालो. सध्या खासदार श्रीकांत शिंदे यांचे पक्ष वाढीबाबतचे निर्णय अत्यंत प्रभावी आहेत. माढा लोकसभा संपर्क प्रमुख सुजित खुर्द यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्ष बांधणी अधिक जोमाने करू. आगामी काळात कोणतीही निवडणूक नसली तरी, संघटना तळागाळापर्यंत पोहचवणे हाच आमचा मुख्य मानस आहे.”

विशाल गायकवाड यांच्या निवडीमुळे करमाळा आणि माढा तालुक्यात युवा सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीनंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.