
करमाळा प्रतिनिधी
नसरापूर, ता. भोर, जि. पुणे येथे वेदवती कुलकर्णी या चार वर्षीय ब्राम्हण बालिकेवर लैंगिक अत्याचार व हत्येच्या घटनेबाबत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे या घटनेचा तीव्र निषेध व कठोर कारवाईची मागणी तहसीलदार , पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक करमाळा यांना निवेदन देऊन करण्यात आली. या निवेदनाची प्रत पीआय रणजीत माने यांनाही देण्यात आली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील नसरापूर, ता. भोर येचे नसरापूर येथील मंदिरातील पुजारी यांची नात आपल्या आजी आजोबांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेली असताना वेदवती कुलकर्णी या चार वर्षीय निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या झाल्याची घटना अत्यंत संतापजनक, वेदनादायी आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, पीडीत बालिका सुट्टीसाठी आजीकडे आली असताना ती बेपत्ता झाली आणि नंतर तिचा मृतदेह गावातील गोठ्यात आढळून आला. या प्रकरणी ६५ वर्षीय संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालविण्याची माहितीही वृत्तांमध्ये नमूद आहे. अशा घटना वारंवार घडू नये यासाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे.

आम्ही, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने या अमानुष, क्रुर आणि निंदनीय घटनेचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करीत आहोत.
पीडीत बालिकेला तातडीने न्याय मिळावा, तसेच आरोपीला कायद्यानुसार अत्यंत कठोर शिक्षा व्हावी, ही आमची ठाम मागणी आहे. तसेच या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार व कायद्याचे संरक्षण मिळावे अशी आम्ही शासनाला विनंती करत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी ब्राह्मण समाजाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे, बजरंग दलाचे संतोष वाळुंजकर, नगरसेवक सचिन अब्दुले, दिपक चव्हाण, पिलू इंदलकर, संताजी घोरपडे आदी जण उपस्थित होते.