करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील सहकारी संस्था, कार्यरत असलेले प्रकल्प आणि नियोजित प्रकल्प मोडकळीस यावेत म्हणुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी देव पाण्यात ठेवले असुन करमाळा तालुक्याविषयी एक विखारी मानसिकता बाळगुन ते फक्त राजकारण करत असल्याचा थेट आरोप आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे.

सध्या आदिनाथ कारखान्याची लिलावाची नोटीस व माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे लिलावा विषयी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाषणातुन केलेले भाकीत शिंदे गट सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. याला पाटील गटाकडुन लागलीच उत्तर देण्यात आले आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, आदिनाथ लिलावाच्या या अगोदरच्या तारखेलाही माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी ढोल बडवत बोभाटा केला होता परंतु शेवटी त्यांचा ढोल फुटला पण लिलाव झाला नाही. आताही तेच होणार असुन एका क्षणिक सणाधानासाठी माजी आमदार गळ्यात ढोल घेऊन फिरले तरी जनतेवर फारसा परिणाम होणार नाही. दुसरीकडे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होऊ पाहणाऱ्या नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे नाव बदलुन हा प्रस्ताव गेली पाच वर्षे हाणुन पाडला. तर दुसरीकडे स्वतःच्या आमदार पदाच्या कार्यकाळात उजनी धरणग्रस्तांच्या त्यागातुन निर्माण झालेल्या उजनीतील पाणी इंदापूर येथील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून देण्यास संमती दिली. आमदार नारायण आबा पाटील यांच्या अथक प्रयत्नानंतर कार्यान्वीत झालेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची मागील पाच वर्षात वाट लावली व केवळ श्री कमलाई या स्वतःच्या कुटुंबातील साखर कारखान्यास पाणी मिळावे म्हणुन याचा वापर तर केलाच पण कायमस्वरूपी सोय व्हावी म्हणुन पाणी आराखड्यात तसे बदल सुध्दा करण्यास सुरुवात केली होती. जातेगाव-टेंभुर्णी हा महामार्ग सन २०१९ पुर्वी राज्य सरकारकडे होता. पण सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी राज्यसरकारकडून निधी मिळवून हा रस्ता तातडीने करण्याऐवजी हा रस्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला. आजमितीस या रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नाही जर हा रस्ता राज्य सरकारकडे राहीला असता तर आमदार म्हणुन सभागृहात आवाज उठवून हा प्रश्न मार्गी लावला गेला असता. एकुणच माजी आमदार संजयमामा शिंदे यांची करमाळा तालुक्यातील जनतेकडे पाहण्याची दृष्टी ही विकासापासून वंचित ठेवणारी आहे हे या मोजक्या उदाहरणावरून दिसून येते. यामुळे आता आदिनाथ बाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कितीही ढोल बडवला तरी जनता त्यांना आदिनाथ बाजुला ठेऊन स्वतःच्या मालकीचा म्हैसगाव येथील श्री विठ्ठल शुगर का विकला हा प्रश्न विचारत आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी हिंमत असेल तर याचे उत्तर अगोदर द्यावे व नंतर आदिनाथ बद्दल बोलावे असा टोला सुनील तळेकर यांनी लगावला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *