
करमाळा प्रतिनिधी
यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच वाघोली, पुणे येथे पार पडली. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी अनेक नामांकित व आजी माजी महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांची नावे संभाव्य विजेते म्हणुन चर्चेत आली होती. या मोठ्या नावांमध्ये वयाने लहान असलेल्या जयदिप पाटलाचे नाव कोणी घेतले नाही आणि कोणी याबद्दल कल्पनाही केली नाही. पण जशी जशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुढे जाऊ लागली, एक एक कुस्ती पार पडु लागली तस तशी जयदिप पाटील याच्या नावाची चर्चा सगळ्यांच्या मुखातून बाहेर पडू लागली. या स्पर्धेचा डार्क हॉर्स अर्थात संभाव्य विजेता म्हणुन पाहु जाऊ लागलं. जयदिप पाटील हा मॅट वरील कुस्तीमध्ये आपले कौशल्य दाखवून अगदी सेमी फायनल पर्यंत पोहचला. मुळातच मॅटवरील कुस्तीला खुप कौशल्य, ताकद, डावपेच आणि दम लागतो. जयदिपकडे हे सगळं अगदी ठासून भरलेलं होतं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता हा जरी एक ठरवला जात असला तरी यात दोन प्रकारच्या फायनल होतात. एक मॅट वरील फायनल व दुसरी

मातीमधील फायनल कुस्ती होय. यानंतर या दोन्हीतील विजेते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गधेसाठी लढत असतात. पैलवान जयदिप पाटील याने मागील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता पैलवान पृथ्वीराज मोहोळ याला चीतपट करुन मॅटवरील फायनल मध्ये धडक मारली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याच्या विरुद्ध झालेली कुस्ती ही या स्पर्धेतील सर्वोत्तम व आकर्षक कुस्ती मानली जाते. याच कुस्ती मुळे पैलवान जयदिप पाटील हा संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेत आला. आता मॅटवरील फायनल मध्ये सुद्धा जयदिपला आणखी एका महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवाना बरोबर लढत द्यायची होती. यामुळे मग इथे त्याचा खरा कस लागणार होता. महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीर बरोबर जयदिप पाटील याची लढत होती. कुस्ती सुरू झाली आणि पहिल्या काही मीनीटात जयदिप पाटील हा विजयी होईल असे वाटु लागले. पण मॅटवरील फायनल कुस्तीचे दडपण जयदिपच्या खेळातून दिसु लागले आणि अशातच पंचांकडुन जयदिपला निष्क्रिय कुस्तीची समज देण्यात आली. इथुनच कुस्तीने दिशा बदलली. पंचांच्या समज अर्थात कॉशन नंतर काही वेळातच जयदिपला आक्रमक कुस्ती करुन गुण घेणे बंधनकारक होते. अन्यथा हर्षवर्धन सदगीरला एक गुण दिला जाणार होता. नेमके याचवेळी संयम राखुन गुण जाऊ द्यायचा आणि पुढील उर्वरित कुस्तीच्या वेळेचे नियोजन करायचे कि आता आक्रमक होऊन एक गुण घ्यायचा या द्विधा मनस्थितीत जयदिप अडकुन पडला आणि अनुभवी असलेल्या हर्षवर्धन सदगीर याने ही वेळ हेरुन डावपेच आखले. या सगळ्या घडामोडी काही सेकंदात घडल्या. आणि शेवटी हर्षवर्धन सदगीर याने कुस्तीवर ताबा मिळवला व विजयी झाला.

जयदिप पाटील कुस्ती हरला. महाराष्ट्र केसरी गधेपासुन केवळ एक कुस्ती दुर असतानाच जयदिप पाटील याचे सन २०२६ मधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पण नियमानुसार मॅटवरील कुस्ती पध्दतीत पैलवान उपविजेता म्हणजेच या प्रकारात उपमहाराष्ट्र केसरी ठरला. कुस्ती हरला तरी पैलवान जयदिप पाटील याने लाखो कुस्ती शौकीनांची मने जिंकली आहेत. पैलवान जयदिप पाटील याचे वय लहान आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पहिल्या चार मध्ये प्रवेश करणारा जयदिप हा सर्वात वयाने लहान पैलवान आहे. एक वेगळा विक्रम नोंदवला गेला. तसेच एवढ्या लहान वयात लागोपाठ दोन कुस्त्या त्याने महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानां विरोधात लढल्या हेही नसे थोडके. त्याचा हा कुस्ती प्रवास कौतूक करण्यासारखाच आहे. पैलवान जयदिप पाटील याचे मुळ गाव लव्हे ता. करमाळा जि.सोलापुर हे आहे. जयदिपचे वडील पै. राजन (अण्णा) पाटील हे सुद्धा एकेकाळी कुस्ती खेळलेले आहेत. तर जयदिप पाटील याचे चुलते अर्थात करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील हे पाच वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनात ७४ किलो वजन गटात विजेते ठरलेले आहेत. तर ७४ किलो वजन गटातुन ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले आहे. संपुर्ण भारतात पहिला येण्याचा बहुमान आमदार नारायण आबा पाटील यांनी मिळवला आहे. यामुळे पैलवान जयदिप पाटील यांच्या घराला कुस्तीचा वारसा व परंपरा लाभली आहे. पैलवान अतुल पाटील यांनी सुद्धा दोन वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यामुळे आता भविष्यात पैलवान जयदिप पाटील याचेकडुन महाराष्ट्रातील लाखो कुस्ती शौकीनांची अपेक्षा अजुन वाढली आहे. जरी पैलवान जयदिप पाटील हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकला नसला तरी त्याने या स्पर्धेत दाखवलेली जिद्द व चिकाटी भविष्यात त्याला कोणीही महाराष्ट्र केसरीच्या गधेपासुन दुर ठेऊ शकणार नाही हे मात्र नक्की आहे.
हार कर जितनेवालों को बाजीगर कहतें हैं…या प्रमाणे पैलवान जयदिप पाटील कुस्ती हरला पण मन जिंकून बाजीगर ठरला आहे असे मत आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी माडले.