करमाळा प्रतिनिधी

गणेशोत्सवाचे औचित्य साधून कर्मवीर अण्णासाहेब जगताप कला-क्रीडा मंडळ, करमाळा यांच्या वतीने तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ११२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिरात रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर) तसेच ईसीजी यांसारख्या विविध महत्त्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीनंतर गरजेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच पावसाळ्यात उद्भवणारे आजार, डेंग्यू, मलेरिया यांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि आरोग्यविषयक उपाययोजनांबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. शरदकुमार पवार यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्सवाच्या काळात केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम न घेता समाजाप्रती असलेल्या कर्तव्याच्या भावनेतून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मंडळाचे आभार मानले.

मंडळाचे संस्थापक अॅड. शिवराज जगताप म्हणाले की, “गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र मंडळ वर्षभर वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असते. सामाजिक सलोखा आणि समतेचा संदेश देणे हा मंडळाचा प्रमुख उद्देश आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. मंडळात हिंदू, दलित आणि मुस्लिम बांधव एकत्रितपणे सहभागी होत असून, यातून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला जातो.”

“उत्सवाचा आनंद घेत असताना समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश होता,” असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शिबिराच्या उद्घाटनानंतर श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी आझाद शेख, नगरसेवक युवराज चिवटे, समीर शेख, नागेश राखूडे, राजू इंगोले, दुधाळ महाराज, राखूडे, नरेंद्रसिंह ठाकूर, शिवराज जगताप, अॅड. जांभळे आदी उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी ‘आपला दवाखाना’, करमाळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरदकुमार पवार, आरोग्य सेवक दत्ता राठोड, तरवारे सिस्टर तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *