करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. १ शाळेत श्री गुरु तेग बहादूरसाहिब यांच्या 350 व्या बलिदान स्मृतिदिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र टाकळी येथील आरोग्य सेविका राणी जगदाळे, आरोग्य सेवक सुरेश गायकवाड, आशा सेविका बिस्मिल्ला मुलानी, शाळेचे शिक्षक बाळासाहेब बोडखे व बिभीषण सातपुते यांनी या शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. यावेळी आपल्या तिरंग्यासह प्रभात फेरी काढण्यात आली. ज्यातून भारत माता की जय, वंदे मातरम, श्री गुरु तेग बहादुर की जय, चांगला आहार –  जीवनाचा आधार, संतुलित आहार – आजारांना दूर सार, फिट इंडिया- हिट इंडिया, नखे कापा बोटांची – नाही होणार व्याधी पोटाची, गाँव गाँव गली गली– सुपोषण की लहर चली, रोज काढा केर – विषाणूंना करा ढेर, Choose  Healthy – Live Healthy अशा राष्ट्रप्रेम, आहार, आरोग्य चांगल्या सवयी याबाबत घोषणा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

शिवाय महिलांच्या आरोग्य आणि आहार याविषयी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या ज्यातून निरोगी आणि सुदृढ पिढी घडवण्यास मदत होईल असा संदेश समाजापर्यंत पोहोचला. यामध्ये गावातील महिला व मुलींनी विशेष सहभाग घेतला.

शाळेतील शिक्षक तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिनची तपासणी देखील करण्यात आली आणि हिमोग्लोबिनचे महत्व, ते वाढण्यासाठी आवश्यक असणारा आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. WIFS बाबत माहिती देण्यात आली आणि हिमोग्लोबिन आणखी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना पोषक गोळ्या सुद्धा देण्यात आल्या.

रांगोळी स्पर्धेतील सर्व महिलांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देत कर्तुत्वान अशा जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई यांची प्रेरणादायी पुस्तके, शाल, पुष्प तर विद्यार्थिनींना स्वामी विवेकानंद, स्पर्धा परीक्षा, शिवाजी महाराज, सुविचार संग्रह अशी विविध जीवन उपयोगी आणि प्रेरणादायी पुस्तके आणि फुल देऊन गौरवण्यात आले.

या एकूण कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूरसाहिब यांच्या महान कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, त्याग समर्पण, समाजाप्रती आपली सर्वसमावेशक भूमिका आणि त्यातून सर्वांचा विकास याबाबत शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे आणि बिभीषण सातपुते यांनी सर्वांना अनमोल मार्गदर्शन केले.

राष्ट्रभक्ती आणि आरोग्यविषयक जागरूक करणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, शि.वि.अ.जयवंत नलावडे, मिनीनाथ टकले, जगताप मॅडम, केंद्रप्रमुख महावीर गोरे, शा.व्य.स. अध्यक्ष नितीन कोकरे, उपाध्यक्ष आप्पासाहेब धायगुडे आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीने या सर्वांचे कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *