
सोलापूर, दि. १२ ( जिमाका) सोलापूर जिल्ह्यात महा रेशीम अभियान २०२६-२७ अंतर्गत १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या कालावधीत नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ११ मार्चपर्यंत ‘आपले सरकार’ या पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
राज्यात तुती लागवड करून शेतकरी रेशीम कोष निर्मितीद्वारे भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. रेशीम उद्योगासाठी अनुकूल वातावरण असल्याने या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. तुती लागवडीद्वारे एक एकर क्षेत्रातून दुसऱ्या वर्षापासून दोन लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न शेतकरी मिळवत असल्याचे दिसून आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये वर्ष २०२५-२६ मध्ये ९७७ शेतकऱ्यांनी १२६० एकर क्षेत्रावर तुती लागवड केली असून ७ लाख ९२ हजार २५० अंडीपुंजांपासून ४ लाख ५९ हजार ४७६ कोष उत्पादन झाले आहे. यामधून सुमारे २० कोटी ६७ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
मोठ्या प्रमाणावर रेशीम कोष उत्पादन होत असल्याने जालना, बीड, बडनेरा, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी रेशीम उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवड, जोपासना व कीटक संगोपन गृहासाठी तीन वर्षांत एकूण ८९५ मनुष्यदिवसांची मजुरी दिली जाते. यामध्ये मजुरीपोटी २ लाख ७९ हजार २४० रुपये व साहित्यासाठी १ लाख ५३ हजार रुपये, असे एकूण ४ लाख ३२ हजार २४० रुपये अनुदान देण्यात येते.
तसेच केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र’ योजनेअंतर्गत प्रति एकर तुती लागवडीसाठी ४५ हजार रुपये, सिंचन संचासाठी ४५ हजार रुपये, कीटक संगोपन गृहासाठी २ लाख ४३ हजार ७५० रुपये, संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० रुपये व निर्जंतुकीकरण औषधासाठी ३ हजार ७५० रुपये, असे एकूण ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ‘सिल्क समग्र-२’ योजनेतून दोन एकर तुती लागवडीसाठी कीटक संगोपन गृह, साहित्य व निर्जंतुकीकरण औषधांसह एकूण ५ लाख ६२ हजार ५०० रुपये अनुदान उपलब्ध आहे.
मनरेगा व सिल्क समग्र योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी विनित सुनीता सुरेश पवार यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी श्री. एम. जे. गवंड (मो. ९५६१३७१६७४) व श्री. बी. एन. सूर्यवंशी (मो. ९४२२४६२७७६) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.