
सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न
सोहळ्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती
सोलापूर, दि.१४ (जि. मा. का.) :
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला. या सोहळ्यास
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. अक्षता सोहळा पार पडताच ‘हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

अक्षता सोहळ्यासाठी खासदार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,
सर्वश्री आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, श्रीमती प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले,सर्वश्री माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, शिवशशरण पाटील, रविकांत पाटील, बारामती ॲग्रोचे राजेंद्र पवार, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्वस्त ऍड. मिलिंद थोबडे आदि उपस्थित होते.
या मुख्य सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून हजारो भाविक दाखल झाले होते.

'शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय' या जयघोषात आज दुपारी 2.21 वाजता सत्यम सत्यम... दिड्डम... दिड्डमचा उच्चार झाला अन् चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी शनिवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपरिक अक्षता सोहळा भक्ती भावात पार पडला. श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. संमती कट्याजवळ गंगा पूजन व सुगडी पूजन झाले. मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचे हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन केले. सत्यम सत्यम म्हणताच भाविकांनी अक्षता टाकल्या.
