रिटेवाडी उपसा सिंचन बैठक आयोजित करण्याचे आदेश – मा आ नारायण पाटील
करमाळा प्रतिनिधी
नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची दखल मुख्यमंत्री यांनी घेतली असून बैठक आयोजित करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली. काल माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पाटील यांनी नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत मुख्यमंत्री यांचेशी प्राथमिक चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली. याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की आदिनाथ कारखान्याच्या मोळी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या मागणीला प्रतिसाद देत नारायण (आबा) तुम्ही टेंशन घेऊ नका असे जाहीर वक्तव्य केले होते. यानंतर आपण मुख्यमंत्री महोदयांना करमाळा मतदार संघातील रखडलेल्या व नियोजित कामांविषयी निवेदने सादर केली. काल आपण प्रत्यक्षात मुख्यमंत्री महोदयांची मुंबई येथे भेट घेतली.

या भेटी दरम्यान आपण रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या शासकीय कार्यवाहीची तातडीने सुरवात झाली तर पुढे ही प्रस्तावित योजना वेळेत पुर्ण होईल अशी इच्छा त्यांचे समोर मांडली. यावर माझ्या निवेदनावर मुख्यमंत्री यांनी शेरा मारुन यात रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात यावे असे आदेश संबंधित विभागास दिल्याने आता नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची शासकीय दरबारी रुजवात झाली आहे. थेट राज्याच्या प्रमुखांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या योजनेच्या पुढील सर्व कार्यवाहीस सुरुवात होईल.संबंधित विभागाकडून प्राथमिक रेखांकन, योजनेचे सर्वेक्षण, खर्चाचे अंदाजपत्रक, विविध कागदपत्रे व नाहरकत प्रमाणपत्र, पाणी वाटप नियोजनाबाबतचा अहवाल आदि कामांना गती येणार आहे. लवकरच संबंधित विभागाचे राज्य सचीव, जिल्हा व तालुका पातळीवर कार्यरत असलेले संबंधित विभागाचे अधिकारी तसेच मंत्रीमहोदय यांचे उपस्थितीत या योजनेची शासकीय बैठक मुंबई मंत्रालयात होणार असून याची तारीख संबंधित मंत्रीमहोदयांची वेळ घेऊन ठरवली जाणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *