
फातिमा बी
फातिमा बी…
आज नऊ जानेवारी
येतेय आठवण
तुमच्या धाडसाची.
माय सोबत तुम्ही ही
घेतलीत उडी
स्त्रियांच्या पायातले
साखळदंड तोडण्यासाठी..
गच्च काळोख कुठवर प्यायचा?

आणि सहन करायचा
स्त्री असण्याचा अभिशाप!
या विचारानं पेटून
उठणाऱ्या तुम्ही
शेण- गोट्यांचा मारा झेलत
हातातल्या पुस्तकांना
निगुतीनं सावरत
घेतला काळजात जाळ पेटवून
बायांच्या शिक्षणासाठी..!
पण एक सांगू.. फातिमा बी! धर्माधर्मातली विचारांची दरी
हात- हात खोल
चिरत चालली आहे..

टाहो ऐकू येत आहेत आजही
झुंडीनं बलात्कार सहन करणाऱ्या
बिलकिसचे आणि
आठ वर्षाच्या असिफाचे
तुम्ही दिलेल्या वाटेवरून चालत
आभाळ गाठत आहोत आम्ही
पण,
पदरात अन् बुरख्यात
गाठ बांधून ठेवलीये कायमची
मनातल्या भीतीची आणि
असुरक्षिततेची
फातिमा बी..

तुम्ही दिलेला जाळ
सोबत घेऊन चालत राहू विस्तवाच्या वाटेवर
पण..
पाणवलेले डोळे पुसायला
पुन्हा तुम्हाला यावं लागेल
पुन्हा तुम्हाला यावं लागेल..
धन्यवाद.
साहित्यिका
अंजली राठोड श्रीवास्तव. करमाळा.
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत)
