
करमाळा प्रतिनिधी
दुर्गराज रायगडावर झालेल्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शेटफळ ता. करमाळा येथील नागनाथ लेझीम संघाने सहभागी होऊन उत्कृष्ट लेझीम सादरीकरण केल्याबद्दल या लेझीम संघाला सन्मानचिन्ह देऊन युवराज संभाजी छत्रपती महाराज व महाराणी संयोगीताराजे महाराज यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील प्राचीन कला संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या विविध लोक कलावंत कलाकार शाहीर गोंधळी वासुदेव आपापली कला सादर करतात शेटफळ येथील नागनाथ लेझीम संघाने प्राचीन लेझीम कला जतन केले असून पारंपारिक हलगीच्या ठेक्यावर होत असलेल्या या लेझीम कलेचे सर्वत्र कौतुक केले जाते. शेटफळकरांनी जपलेली पुरातन लेझीम परंपरा कला पाहून युवराज संभाजीराजांनी कौतुक करत भर पावसात या पथकातील तरुणांबरोबर लेझीमचा ठेका धरला.

सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ तालुका करमाळा येथील तरुणांनी प्राचीन लेझीम परंपरा जोपासलेले आहे. गावातील 200 सदस्य असलेला हा लेझीम संघ रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्याला जाण्यापूर्वी पंधरा ते वीस दिवस दररोज संध्याकाळी सराव करून या सोहळ्याला जाण्यासाठी तयारी करत असतात यावर्षीही 125 जणांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात लेझीम सादरीकरणात सहभाग नोंदविला. राज्याभिषेक सोहळ्यानंतर होळीच्या माळावर युवराज संभाजी राजे व प्रमुख मान्यवरांसमोर भर पावसात लेझीम संघाने उत्कृष्ट सादरीकरण केले या सादरीकरण बद्दल या संघाला गौरवण्यात आले आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेलेल्या शेटफळ येथील लेझीम पथकातील तरुणांनी केवळ लेझीमचे सादरीकरण केले नाही तर या ठिकाणी दोन दिवस स्वयंसेवक म्हणून किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांची गर्दी नियंत्रणाचे स्वयंसेवक म्हणून काम पाहिले तर येताना गडावर कार्यक्रमाच्या वेळी झालेला कचरा प्लॅस्टिक याची स्वच्छता केली. संघाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
