करमाळा प्रतिनिधी

गुंतवणूक व वित्त सल्ला क्षेत्रात अत्याधुनिक सेवा देणाऱ्या ‘कॅपिटिक्स वेल्थ’ या नव्या पिढीच्या वित्तीय संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन दिनांक २ जून २०२५ रोजी आनंदनगर, पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

या भव्य समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी सामाजिक, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. विकास नाना दांगट, काकासाहेब चव्हाण, अक्रूर शेठ कुदळे, डॉ. अरुण महाजन, चंद्रकांत नेमाडे, शैलेश बोथरा व सुमित दोरगे या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कॅपिटिक्स वेल्थचे संस्थापक मयूर बल्लाळ व पुष्कर झांबरे यांनी संस्थेच्या उद्दिष्टांचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, संस्थेचा प्रमुख हेतू केवळ आर्थिक सल्ला देण्यापुरता मर्यादित नसून, गुंतवणूकदारांना सुरक्षित, पारदर्शक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून सक्षम बनविणे हाच खरा हेतू आहे.

बल्लाळ यांनी स्पष्ट केले की, “आजच्या घडीला ‘जास्त परतावा’ देण्याचे आमिष दाखवून अनेक बनावट गुंतवणूक योजना आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकार समाजात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या प्रकारांमुळे अनेक सामान्य गुंतवणूकदार आपली मेहनतीची गुंतवणूक गमावत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक स्थैर्यावर होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन ‘कॅपिटिक्स वेल्थ’ संस्थेमार्फत वित्तीय साक्षरतेचा व्यापक प्रचार आणि प्रसार करण्याचा आमचा कटाक्ष आहे. यासाठी आम्ही लवकरच विविध जनजागृती मोहिमा, डिजिटल कॅम्पेन्स, तसेच प्रात्यक्षिक कार्यशाळा आणि वेबिनार्स आयोजित करून लोकांपर्यंत योग्य वित्तीय माहिती पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. लोकांना फसवणुकीपासून जागरूक करणे व त्यांना सुज्ञ निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.”

झांबरे यांनी सांगितले की, “गुंतवणुकीच्या क्षेत्रात आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्मची गरज सर्वाधिक आहे. कॅपिटिक्स वेल्थच्या माध्यमातून आम्ही SIP, SWP, आणि गोल-बेस्ड म्युच्युअल फंड योजना सादर करत आहोत. त्याचबरोबर कॉर्पोरेट इन्शुरन्स सोल्यूशन्सदेखील व्यवसायिकांसाठी कस्टमाइज करून देणार आहोत. आमच्या सेवा पूर्णतः टेक्नो-ड्रिव्हन, पारदर्शक आणि ग्राहककेंद्री असतील जेणेकरून प्रत्येक गुंतवणूकदाराचा आर्थिक प्रवास सुरक्षित, सुसंगत आणि शाश्वत राहील.

कॅपिटिक्स वेल्थ म्युच्युअल फंड्स, प्रायव्हेट इक्विटी, कॉर्पोरेट इन्शुरन्स, सोलर सोल्यूशन्स आणि फिनान्शियल प्लॅनिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये सेवा देत आहे. व्यावसायिक सल्ला, नैतिक मूल्ये आणि नवोन्मेषी दृष्टिकोन हे संस्थेचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.

या उद्घाटन सोहळ्यामुळे पुणे शहराच्या गुंतवणूक व वित्तीय क्षेत्रात एक नवा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला असून, या नव्या पर्वाची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी आणि आश्वासक ठरली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *