
करमाळा प्रतिनिधी
सरफडोह येथील देवस्थान जमिनीचा अनेक वर्ष रेंगाळलेला प्रश्न सोडवण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी मोनिका सिंह अपर जिल्हाधिकारी, सोलापूर यांची प्रत्यक्षात भेट घेतली. यावेळी मोनिका सिंह यांचे दालनात सरफडोह देवस्थान जमिनीबाबत बैठक पार पडली. आमदार नारायण आबा पाटील यांनी सरफडोह येथील शेतकऱ्यांच्या समस्या

उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे समोर मांडल्या. सरफडोह येथील बहुतांश सर्व शेतजमिनी वर देवस्थानाचा मालकी हक्क असल्याचे सांगून गेली अनेक वर्षं ही जमिनी कसुन पिक पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना भुमिहीन करण्याचा हा प्रकार आमदार नारायण आबा पाटील यांनी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे लक्षात आणुन दिला. या जमिनीला वर्ग एक हा दर्जा मिळून शेतकऱ्यांना यावर मालकी हक्क दिला जावा. अनेक वर्षं कृषी संबंधित शासकीय योजनांचा लाभ देखील या शेतकऱ्यांना

हक्काने मिळत होता. परंतू अचानक वर्ग तीन मध्ये या जमिनींचा समावेश केल्याने काही वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. शिवाय मालकी हक्क असुनही सात बारा उतारा हा तांत्रिक चुकीमुळे वर्ग तीनचा निघत असल्याने विविध बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळणेही अवघड झाले आहे. यामुळे हा केवळ काही शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा प्रश्न नसून यामुळे माझ्या करमाळा मतदार संघातील एक संपुर्ण गाव हे भुमिहीन होईल. यामुळे यावर लवकरच तोडगा काढून सरफडोह गावास न्याय दिला जावा अशी बाजू आमदार नारायण आबा पाटील यांनी या बैठकीत मांडली. यावेळी ऍड. नरेश गुगळे, संजय हंडोरे, उपसरपंच नाथराव रंदवे व सरफडोह ग्रामस्थ उपस्थित होते.