
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 या शाळेत मुलांना मोफत कराटे प्रशिक्षण दिले जाते. मोफत कराटे प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील ही जिल्हा परिषदेची दुर्मिळात दुर्मिळ प्राथमिक शाळा आहे.
स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे. मुलांना बालवयापासूनच स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी शाळेमध्ये हे कराटे प्रशिक्षण दिले जात आहे. या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे हे सातत्याने सर्वांगीण शिक्षणाचा आग्रह धरतात आणि आपल्या सहकारी शिक्षकाच्या मदतीने शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देतात.

मुलांना सक्षम बनण्यासाठी आणि मेहनत करण्याची सवय लहानपणापासूनच लागावी म्हणून हे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये वार्म अप एक्सरसाइज, वेगवेगळे पंच, वेगवेगळ्या किक जसे की चॅप/ मावसागिरी, स्ट्रेट लेवल, इनर, आउटर, राऊंड अप, साईड किक, बॅक किक, वेगवेगळे ब्लॉक, स्टमक एक्सरसाइज, स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेतल्या जातात. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रशिक्षण सातत्याने सुरू आहे. याबाबत 26 जानेवारीला सर्व ग्रामस्थांसमोर हे सर्वांना थक्क करून सोडणारे कराटे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण देखील घेण्यात आले होते.

ग्रामीण भागामध्ये या कराटे प्रशिक्षणाच्या सुविधा, प्रशिक्षक उपलब्ध होणे दुर्मिळ आहे पण शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांचे स्वतःचेच ब्लॅक बेल्ट प्रशिक्षण झालेले असल्यामुळे त्यांनी मुलांना याबाबत मोफत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू ठेवलेले आहे. पालकांना हे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून देत त्यासाठी आवश्यक असणारा ड्रेसही उपलब्ध केलेला आहे. ज्यामुळे मुलं अतिशय उत्साहाने आणि नियमितपणे हा सराव करतात.
स्वसंरक्षणाबाबत असे प्रशिक्षण देत असल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, शि.वि.अ. नितीन कदम, मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णा मोरे, शा.व्य.स. अध्यक्ष संतोष झेंडे तसेच सर्व पालक, ग्रामस्थ यांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि उपशिक्षक किरण जोगदंड यांचे विशेष कौतुक केले.
…………….
आम्ही आणि आमची मुलं नशीबवान आहेत की यांना बालवयातच असे सर्वांगीण शिक्षण भेटत आहे असे मत यावेळी पालकांनी व्यक्त केले. कराटेचे वेगवेगळे प्रात्यक्षिक करताना आणि ते शिकताना आम्हाला खूप आनंद मिळतो. यामुळे आमच्या मध्ये आत्मविश्वास वाढत आहे हे मात्र नक्की : ओंकार रणसिंग (विद्यार्थी)
……………
माझ्या शेतकरी, शेतमजूर आणि मच्छीमार कुटुंबातील मुलांना स्वसंरक्षणासाठी सक्षम बनवण्यासाठी हा अट्टाहास आहे आणि ही सर्व मुलं मनापासून या प्रशिक्षणामध्ये सहभागी होतात याचा आनंदही आहे : बाळासाहेब बोडखे मुख्याध्यापक तथा कराटे प्रशिक्षक