
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कारभाराची चौकशी व्हावी असे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रहास चोरमोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक करमाळा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमोद काळे, उमेश बोराडे, संजु कांबळे आदीजण उपस्थित होते.

निवेदनात असे म्हटले आहे की, करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कारभाराची खालील मुद्दयांचे अनुषंगाने चौकशी होणेबाबत याद्दवारे विनंती करीत आहे.
संस्थेचे बांधकाम सध्या सुरू असून सामाईक हक्काचे जागेत दुसऱ्या सामाईकदाराचे अतिक्रमण आहे. (शौचालय तसेच दोन जिने) सदरचे अतिक्रमण न काढताच बांधकाम सुरु करून सदरच्या जागेचा सामाईक हक्क सोडून सभासद बांधवांची फसवणूक करण्यात आल्याची भावाना संस्थेच्या सभासदामध्ये झाली आहे. सामाईक जागेचा वापर न केल्यामुळे संस्थेच्या इमारतीचा जिना स्वतः चे जागेत घेण्याची वेळ या सत्ताधारी संचालक मंडळाने आणली आहे. यामध्ये काय तडजोड केली याची चौकशी संचालक मंडळाकडून करण्यात यावी. सामाईक जागेचा वापर आणि वावर मात्र दुसऱ्या सामाईकदाराचाच आहे. यावर संचालक मंडळ चुकीची उत्तरे देऊन सभासद बांधवांची दिशाभुल करत आहे.

जामीनदार थकीत पण कर्ज मागणी करणारा सभासद हा एकही हप्ता थकबाकीदार नाही. अशा कर्ज मागणी करणाऱ्या सभासदाचे कर्जप्रकरण प्रलंबित ठेवून तीन तीन महिने झाले तरी कर्ज मंजूर केले जात नाही. आणि त्या जामीनदार थकित असलेल्या सभासदांवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई न करता नियमित कर्जफेड असलेल्या सभासदाला कर्जपुरवठा न करता विनाकारण वेठीस धरले जात आहे. वास्तविक कर्ज थकित सभासदांवर पगार जप्तीची अथवा १०१ किवा १३८ अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित असताना असे होताना दिसून येत नाही. संचालक मंडळ मात्र अशा सामान्य नियमित कर्जफेड करणारे सभासद यांना जाणीवपुर्वक त्रास देत आहे. थकबाकी वसुली करण्याची जबाबदारी ही संचालक मंडळाची असून जामीनदार झालेल्या सभासदाची नाही. याचे भान या संचालक मंडळास राहिलेले नाही. चेक बाबत अडवणूकीच्या धोरणाची देखील यानिमित्ताने चोकशी करण्यात यावी.
मयत सभासदांचे कर्जमाफीबाबत मागील सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार अदयापही अंमलबजावणी झालेली नाही.
संस्थेचे बांधकामामुळे पर्यायी ठिकाणी सुरु असलेल्या जागेतील जिना अत्यंत धोकादायक असून तो जिना किंवा जागा बदलली जाईल असे आश्वासून सर्वसाधारण सभेत दिले गेले होते त्याचीही अंमलबजावणी नाही.
संस्थेचे सभासद कायम ठेव व्याज दर व मुदत ठेव व्याज दर यामध्ये तफावत दिसुन येत असून या बाबीचीही चौकशी करण्यात यावी. संस्थेच्या सभासदाला मुदत ठेवीचाच व्याज दर मिळाला पाहिजे यामध्ये मात्र संचालक मंडळ दुजाभाव करत आहे.