करमाळा प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला व पदाधिकाऱ्याला विचारात घेतले जात नसल्याची खंत युवक काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष संभाजी श्रीमंत शिंदे यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना संभाजी शिंदे म्हणाले की, गत दहा वर्षात करमाळा तालुक्यात तळाला गेलेल्या काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचे काम या दोन-तीन वर्षात आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी केले असून वेळोवेळी पक्षाच्या
आदेशाप्रमाणे करमाळा शहर व करमाळा तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने देखील केली असून त्या आंदोलनातून सामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करताना देखील काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याल्या आमंत्रित केले नव्हते. या सर्व घटनांमुळे
कमालीचा नाराजीचा सूर प्रत्येक पदाधिकाऱ्यामार्फत निघत आहे. दोन-तीन दिवसाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते शाहू दादा फरतडे यांनी देखील अशाच प्रकारची खंत व्यक्त केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. वास्तविक पाहता करमाळा तालुका विधानसभेचा निकाल हा प्रत्येक वेळी अटीटतीचा राहिलेला आहे. प्रत्येक वेळी काँग्रेस
पक्षाला डावलण्याचे काम स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्याकडून जर होत राहिले तर आम्ही ही सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित बोलवून त्यांचा विचार घेऊन आमचे नेते करमाळा तालुका काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष प्रतापराव नामदेवराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशीलभैय्या
मोहिते-पाटील यांना समक्ष भेटून सर्व हकीकत त्यांच्या समोर मांडणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाला प्रत्येक वेळी जर गृहीत धरून निवडणुका होणार असतील तर काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी वेगळा निर्णय घेऊ शकतो. असे सूचक वक्तव्य करमाळा तालुका युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी श्रीमंत शिंदे यांनी केले.