
सोलापूर दि.18 (जिमाका) :- – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी घोषित झाला असुन, आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) अन्वये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.

ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येणार नाही., सकाळी 6.00 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10.00 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तीनी निश्चीत ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहीती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.असेही अदेशात नमुद करण्यात आले आहे.


