
करमाळा प्रतिनिधी
“शाळेचे ऋण फेडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योगदान देणे,” या विचाराचे जिवंत उदाहरण सामाजिक कार्यकर्ते तथा कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते अनिल कादगे यांनी घालून दिले आहे.
समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कादगे यांनी अनेक गरजू व्यक्तींना यापूर्वी विविध स्वरूपात मदतीचा हात दिला असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेऊन आपल्या मातृसंस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तब्बल ६५,००० ₹ (पासष्ट हजार रुपये) किमतीचा अत्याधुनिक आर.ओ. वॉटर फिल्टर प्लांट दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथे भेट दिला आहे. या उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना वर्षभर शुद्ध, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध झाले असून विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या या दानशूर व सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय योगदानाबद्दल विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या हस्ते अनिल कादगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय सेनादलाचे अधिकारी कर्नल सुनील राजदेव, यशकल्याणी सेवाभावी संस्था अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील, श्री स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोटचे विश्वस्त भारतराव शिंदे-पाटील, ह.भ.प. माऊली महाराज पठाडे, सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे, सचिव सुभेदार मेजर बिभीषण कन्हेरे, मेजर सुभाष मुटके, मेजर वीर, विद्यालयाचे शिक्षक कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव आणि इतर शिक्षकवृंद तसेच अमोल सुरवसे, मेजर बाळासाहेब शिंदे, किशोर शिंदे, अनिल साळुंके , शंकर वाघमारे, सागर काळे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी अनिल कादगे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, “समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणारे आणि आपल्या शाळेचे ऋण कृतीतून फेडणारे माजी विद्यार्थी हेच शिक्षणसंस्थेची खरी संपत्ती असतात,” असे गौरवोद्गार काढले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून उभारण्यात आलेली ही सुविधा इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
शिक्षणसंस्थेप्रती असलेली आत्मीयता, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि गरजूंसाठी सतत धावून जाण्याची वृत्ती यामुळे अनिल कादगे हे आज समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत असून, त्यांच्या या कार्याने “दान हे केवळ आर्थिक नसते, तर ते सामाजिक जबाबदारीचे सर्वोच्च रूप असते,” याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.