करमाळा प्रतिनिधी
सन २०२९ मधील विधानसभा निवडणुकीत बागल गट उमेदवार उभा करणार नसुन दिग्विजय बागल यांचे आमदारकीचे स्वप्न धुळीस मिळाले असल्याचा खळबळजनक दावा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बागल व शिंदे गटांनी युती करुन काही जागा जिंकल्या आहेत. करमाळा पंचायत समिती वर सुद्धा या युतीने सत्ता स्थापन केली आहे. परंतु आता पाटील गटाकडून तळेकर यांनी केलेल्या या विधानामुळे गावपारावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या दाव्याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बागल गट व शिंदे गटाची युती होण्याच्या हालचाली सुरू असताना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर या दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली व या बैठकीतील काही माहिती आपल्या हाती लागली आहे. त्यानुसार या बैठकीत बागल गटाने आपणास पंचायत समिती सभापती पद व सोलापूर जिल्हा परिषदेतील अध्यक्षपद अथवा एका समितीची मागणी करत असताना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी निवडुन आणलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा रश्मी बागल यांच्या नावाची शिफारस केली जावी या दोन प्रमुख अटी मांडल्या गेल्या होत्या. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी या दोन्ही अटी मान्य केल्या तसेच मकाई कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकीत शिंदे गटाने बागल गटास बिनशर्त पाठिंबा देण्याचेही ठरले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी दिग्विजय बागल यांचे नाव एकमताने मंजूर करण्यात आले. परंतू या बदल्यात माजी आमदार संजयमामा शिंदे गटाने पंचायत समिती उपसभापती पद व सन २०२९ मधील विधानसभा निवडणुकीत पाठींबा द्यावा या दोनच अटी बागल गटासमोर ठेवल्या होत्या. या दोन्ही अटी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी मान्य केल्यानंतरच ही युती पक्की झाल्याची माहिती आपणास सुत्रांकडून समजली. एकंदरीतच या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जागा वाटप, सभापती व उपसभापती निवडी पार पडल्या आहेत. आता बैठकीत ठरल्याप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत बागल गट हा माजी आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा देणार असल्याचे अटीवरुन दिसुन येत आहे. यामुळे बागल गटाचे युवानेते दिग्विजय बागल यांचे आगामी विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. आपणास मिळालेली ही माहिती जर चुकीची वाटत असेल तर बागल गटाने जानेवारी महिन्यात शिंदे यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या बैठकीतील माहिती जनतेसमोर उघड करावी अथवा आगामी विधानसभा निवडणुकीत बागल गटाचा कोणास पाठींबा नसणार असल्याचे स्पष्ट करुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांना आपला विरोध असल्याचे जाहीर करुन दाखवावे असे आवाहन पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले आहे. तळेकर यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे तालूक्यात उलटसुलट राजकीय चर्चा सुरू झाली असुन आता बागल गटाकडून यास काय उत्तर दिले जाणार याकडे संपुर्ण तालूक्याचे लक्ष लागून राहिले आहे.