
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मौजे उमरड येथील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, युवा नेते अण्णा पडवळे यांनी ठाम भूमिका जाहीर करत निवडणुकीत मोठी राजकीय चुरस निर्माण केली आहे. उमरड ग्रामपंचायत निवडणूक ही सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश भाऊ चिवटे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली ताकदीने आणि एकजुटीने व गावातील सर्व समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेऊन लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णा पडवळे म्हणाले की, “गणेश भाऊ चिवटे हे केवळ नेते नसून विकासाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी तालुक्यातील वीट जिल्हा परिषद गटात राबवलेली विकासकामे ही त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देतात. प्रत्येक गावात रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी ठोस काम केले आहे.”

ते पुढे म्हणाले, “उमरड गावालाही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळवून देत विविध कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे गावातील जनतेचा विश्वास चिवटे यांच्या नेतृत्वावर अधिक दृढ झाला आहे. याच विश्वासाच्या बळावर आम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहोत.”
“ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल. गावाच्या प्रगतीसाठी, तरुणांच्या भविष्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही एकदिलाने मैदानात उतरणार आहोत,” असा निर्धारही पडवळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या घोषणेमुळे उमरड ग्रामपंचायत निवडणुकीत चिवटे समर्थक पॅनल अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत असून, येणाऱ्या निवडणुकीत राजकीय समीकरणे चांगलीच रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
यावेळी त्यांच्यासोबत गणेश शहाजी चौधरी, समाधान गायकवाड, अजिंक्य बदे, धनाजी चांगदेव बदे उपस्थित होते.