
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांचा ७१ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
करमाळा (प्रतिनिधी): विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय विलासरावजी घुमरे सर यांचा ७१ वा वाढदिवस यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील यशवंत परिवाराच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिर, क्रीडा मैदानाचे उद्घाटन, व्याख्यान आणि सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात यशवंत परिवारातील सदस्य, एनसीसी, एनएसएस आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूण ७१ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून घुमरे सरांच्या वाढदिवसाला सामाजिक संदेश दिला.
दिनांक ६ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर विलासरावजी घुमरे सरांच्या हस्ते गोळा फेक मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या घडवून आणला. यावेळी घुमरे सरांनी क्रीडांगणातील झाडांना संरक्षण देण्यासाठी आणि संपूर्ण क्रीडांगणाला कंपाऊंड करण्याचे आश्वासन दिले. तसेच, महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहात श्री विलासराव घुमरे सर आणि त्यांच्या पत्नी सौ. जयश्रीताई घुमरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात प्रख्यात व्याख्याते श्री. जयवंत आवटे (कुंडल) यांचे विनोदी आणि सुश्राव्य व्याख्यान आयोजित करण्यात आले. आवटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आजच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात नातेसंबंध कसे घट्ट ठेवावेत, हे पटवून दिले. तसेच, सत्कारमूर्ती विलासरावजी घुमरे सर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी केले. त्यात त्यांनी घुमरे सरांचा जीवनपट उलगडून सांगितला. डॉ. माने म्हणाले, “घुमरे सरांनी शुन्यातून सुरुवात करून लोकांमध्ये प्रेम, राजकारणात महत्त्वाचे स्थान आणि स्वकर्तुत्वाने वैभव निर्माण केले.” यावेळी सत्काराला उत्तर देताना घुमरे सर म्हणाले, “तुम्ही केलेले सत्कार हे मला उतारवयात एनर्जी देतात. ही एनर्जी टिकवून ठेवण्याचे काम माझ्या आयुष्यात यशवंत परिवार कायम करीत आलेला आहे.”
वाढदिवसानिमित्त घुमरे सरांनी महाविद्यालयाला मौल्यवान भेटवस्तू दिल्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपयांची पुस्तके, महाविद्यालयातील दोन एकर क्षेत्रातील वृक्षांच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण आणि स्वच्छ भारत अभियानासाठी ३१ डस्टबीन भेट म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांमध्ये संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव श्री. विक्रमसिंह सूर्यवंशी, विश्वस्त संभाजी किर्दाक सर, सुनबाई सौ कोमलताई घुमरे, कवीवर्य सुरेश शिंदे, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे सर, प्राचार्य नागेश माने, प्रा. शीलवंत सर, बारामती ॲग्रोचे श्री. सुभाष गुळवे, राजेंद्र घाडगे आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे पत्रकार यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. सुजाता भोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले. हा वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा ठरला.
