
महाविद्यालयीन तरुणींनी पालकांचा विश्वास संपादन करून शिक्षण पूर्ण करावे- प्रा. डॉ. संगीता पैकेकरी
करमाळा दि.३/०१/२०२३ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गुळसडी येथे सुरु असलेल्या श्रम संस्कार शिबिरामध्ये बालविवाह प्रथा, महिला सबलीकरण आणि मुलींच्या समस्या या संदर्भात प्रबोधन करण्या साठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संगीता पैकेकरी यांना निमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्यास शिबिरार्थी विद्यार्थिनी आणि गुळसडी येथील अर्चना गायकवाड, योगिता जानभरे आणि रत्नमाला गायकवाड यांच्यासमवेत महिला बचतगटाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या. उपस्थित सर्व मान्यवर महिलांचे स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे यांनी केले तर प्रा. डॉ. विजया गायकवाड यांनी डॉ. संगीता पैकेकरी यांचा परिचय करून दिला.

प्रस्तुत मेळाव्यामध्ये डॉ. पैकेकरी यांनी उपस्थित मुली व महिलांना मासिक पाळी, स्त्रियांविषयीचे कायदे, महिलांना सर्वत्र मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूक, आर्थिक स्वावलंबन इ. विषयांवर मार्गदर्शन केले तसेच आजच्या काळात मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पालकांचा विश्वास संपादन करून व मुलांनी दाखवलेल्या प्रलोभनांना व दमदाटीला बळी न पडता चांगले वागून आपले शिक्षण पूर्ण करावे असे आवाहन केले. तसेच संकटसमयी न घाबरता निर्भया पथकाची मदत घेण्याचा सल्ला दिला.
या महिला मेळाव्यामध्ये अनेक मुलींनी आणि महिलांनी आपल्या मनातील व्यथा आणि वेदना बोलून दाखविल्या यावेळी अनेक महिलांना आपले अश्रू अनावर झाले.
सदर मेळाव्यामध्ये दिपाली राऊत, आम्रपाली कांबळे, अमृता आरणे, सुप्रिया पवार, साक्षी मोरे तसेच अर्चना गायकवाड यांनी स्त्रियांच्या समस्यांवर चर्चा करतांना महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.
या मेळाव्यामुळे आम्हाला आत्मभान आले असे सांगून विद्यार्थिनींनी आज आम्हाला आमच्या भावना व्यक्त करता आल्या याबद्दल समाधान प्रकट केले.


