करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत अनेक वर्षापासून धुळखात पडून होती. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून रुग्णालया च्या इमारतीचे हस्तांतरण करून त्या ठिकाणी आवश्यक ती स्टाफ भरती करण्यात आली. असे असताना सुद्धा पूर्णवेळ सेवा सुरू ठेवण्याऐवजी फक्त काही वेळच दवाखाना सुरू ठेवला जात आहे. त्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.संबंधित रुग्णालयातील गैरसोयीबद्दल करमाळा तालुक्याच्या माजी सभापती सुनीता निमगिरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र लिहून कल्पना दिली आहे. जर या रुग्णालयातून रुग्णांना सुविधा मिळत नसतील तर आपण धरणे आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालय जेऊर ता. करमाळा येथे पूर्ण डॉक्टर, सर्व सिस्टर, शिपाई, सुरक्षा रक्षक, फार्माशिस्ट इ सर्व जागा भरलेल्या असताना सुद्धा फक्त सकाळी OPD झाल्यानंतर रुग्णालय बंद करण्यात येते. ग्रामीण रुग्णालय जेऊर येथे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर असतानाही डिलिव्हरी व सिजर होत नाही. इमर्जन्सी पेशंटना वारंवार दवाखाना बंद झाला दुपारीच असे सांगून पुढे पाठवण्यात येते.

काल रात्री जोरात पोटात दुखत असलेल्या माझ्या पेशेंटला घेऊन मी ग्रामीण रुग्णालयात गेले असता फक्त १ शिपाई होता व त्यानेही दुपारनंतर दवाखाना बंद असतो अजून २४ तास सेवा चालू झालेली नाही असे सांगून खाजगी दवाखान्यात जाण्यास सांगितले. असे वारंवार पेशंट सोबत घडत आहे. तसेच या रुग्णालयात ऑपरेशन रूम, लॅब, पीएम रूम उपलब्ध असताना सुद्धा रुग्णाला दुसऱ्या दवाखान्यात जाण्यास भाग पाडतात. तरी त्वरित ग्रामीण रुग्णालय जेऊर ता. करमाळा येथे सर्व सेवा चालू करण्यात याव्या. अन्यथा ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *