
करमाळा(प्रतिनिधी) – येथील वेताळपेठ-खडकपुरा परिसरात असलेल्या कोठावळेश्वर-महादेव या पुरातन मंदिराच्या जागेत व भोवतालच्या परिसरात अतिक्रमण करून श्री.जालिंदर माने यांनी अनाधिकाराने व अनधिकृत बांधलेले घर व हे संपूर्ण अतिक्रमण नगरपरिषदेने तातडीने हटवावे अशा मागणीचे निवेदन या परिसरातील तसेच शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

सि.स.क्र.४४२ मध्ये असलेल्या या मंदिराचा काही वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला आहे.या मंदिराच्या मालकीच्या पश्चिमेस असलेल्या मोकळ्या जागेत तसेच भोवतालच्या सि.स.क्र.४४०,४४१,४१९ या जागेमध्ये माने यांनी अतिक्रमण करून घर बांधून पूर्ण जागेचा बेकायदेशीर कब्जा घेतला असून मंदिराच्या पूर्वेकडून कन्या शाळेकडे जाणारा,पश्चिमेकडून बारवाकडे जाणारा हे सार्वजनिक बोळ बंद केले आहेत.तेव्हा हे अतिक्रमण तातडीने हटवावे अन्यथा या मागणीसाठी भाविक नागरिकांच्या वतीने या मंदिराचे वहिवाटदार सचिन कृष्णराव वैकर हे
येत्या दि.२२ मे २०२४ पासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती आमदार संजयमामा शिंदे,जिल्हाधिकारी,तहसीलदार करमाळा,पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आल्या आहेत.