
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये एनसीसी विभागातर्फे आर्मी, वायुसेना, पोलीस भरती इत्यादी क्षेत्रांमध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. या समारंभास प्रमुख उपस्थिती विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर व विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांची होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अभिमन्यू पी. माने हे होते. यावेळी एन.सी.सी. विभागातील एकूण दहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यापैकी नऊ विद्यार्थी हे अग्नीवीर मध्ये भरती झाले व कॅडेट रावसाहेब गव्हाणे वायुसेना मध्ये भरती झाला. अग्निवीर भरती झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॅडेट सुमित घाडगे, शुभम शिंदे, संघर्ष उबाळे, राजेश गोरे, प्रतीक साळवे, प्रदीप फाटके, ज्ञानेश्वर गुंड, अमर देवरे यांचा समावेश आहे. तसेच महाविद्यालयातील बी.ए. भाग तीन मधील शेवटच्या वर्षामध्ये शिकत असणाऱ्या इरफान पठाण याची मुंबई पोलीस येथे निवड झाली. यावेळी नुकतेच आर्मी अग्निवीरचे ट्रेनिंग घेऊन

आलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर यांनी ‘एन.सी.सी. हे देशसेवा व करियर घडवण्याचे माध्यम आहे.’ असे मत व्यक्त करून या विद्यार्थ्यांशी प्रशिक्षणाबद्दल हितगुज केले व त्यांचे कौतुक केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी प्रशिक्षणास जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व उपस्थित असलेल्या सर्व एन.सी.सी. कॅडेट्सना मार्गदर्शन केले. तर अध्यक्षपदावरुन बोलताना डॉ. अभिमन्यू माने सर यांनी कॅडेट्सला संस्थेच्या सचिवांचा व अध्यक्षांचा एन.सी.सी. विभागास असणारा सहकार्य आणि भक्कम पाठिंबा कसा व किती आहे हे उदाहरण देऊन सांगितले. तसेच एन.सी.सी. कॅडेट्स ला होणारा फायदा व महत्त्व सांगितले. यावेळी भरती झालेल्या कॅडेट सुमित घाडगे व रावसाहेब गव्हाणे यांनी मनोगते व्यक्त केली व प्रशिक्षण घेऊन आलेला अग्नीवीर समर्थ वीर यांनी देखील आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.सी.सी. विभागाचे प्राध्यापक राम काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट अभिषेक करकुटे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार कॅडेट संस्कृती कांबळे हिने मानले. कार्यक्रमास एनसीसी विभागाच्या प्रमुख कॅप्टन विजया गायकवाड, निलेश भुसारे व एनसीसी कॅडेट यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.