बँक आणि सरकारच्या नियमात शेतकरी भरडला जातोय
▪️ दिशाभूल करणारे आदेश देण्याचे सरकारने बंद करावे
▪️ अन्यथा रस्त्यावर उतरू : जनशक्ती संघटनेचा इशारा
/ प्रतिनिधी
यंदा जून महिन्यात पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेताची मशागत करून पेरणी आणि लागवडीसाठी शेतकरी धावपळ करत आहे मात्र खिशात दमडा नसल्याने पीक कर्जाशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र सिबिल स्कोर खराब असल्यामुळे बँका शेतकऱ्यांना दारात देखील उभा राहू देत नाहीत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी सिबिल स्कोर चा नियम व अटी लावू नये असा आदेश दिला. मात्र सर्व बँकांनी या आदेशाची पायमल्ली केली असून एकही बँक शेतकऱ्यांना एक कर्ज द्यायला तयार नाही याबाबत सरकारने ठोस पावले उचलावीत अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गतवर्षी दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांना यंदाच्या शेतीसाठी पैसा उपलब्ध नाही. निसर्गाच्या सुलतानी आणि शासनाच्या पठाणी संकटापुढे शेतकरी हतबल झालेला आहे. कधी नव्हे ते यंदा जून महिन्यात मान्सून पूर्व पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून घेतली. मात्र यापुढे जाऊन त्यांना लागवडीसाठी व पेरणीसाठी पैसा उपलब्ध होत नाही. पीक कर्जासाठी बँकांचे दरवाजे ठोठावले तर बँका शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर चेक करून दरवाज्याकडे बोट करत आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आधार देण्याचा प्रयत्न केला आणि सिबिल स्कोर चेक न करता पीक कर्ज देण्याचा आदेश बँकांना दिला. मात्र सरकारचा हा आदेश बँकांनी केराच्या टोपलीत टाकला.
शासनाच्या आदेशानंतरही बँका शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर चेक करत आहेत. सिबिल स्कोर रेट ठीक नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळे लागवड आणि पेरणीसाठी शेतकऱ्यांना सावकारांचे दरवाजे झिजवावे लागत आहेत. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी घरातील सोने नाणे गहाण ठेवले आहे तर कित्येकाने बायकांचे मंगळसूत्र देखील विकले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा जनशक्ती संघटना करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे राणा वाघमारे, गणेश वायभासे, रामराजे डोलारे, किशोर शिंदे, सोमा कातुरे, जयसिंग पाटील, बिभिषण शिरसट, महेश नरसाळे, रवींद्र नरसाळे, शहाजी नरसाळे, राहुल जाधव, शंकर नरसाळे, अक्षय देवडकर, सुशांत खूपसे, अभिमान गायकवाड उपस्थित होते.
▪️ चौकट
शासनाचा आदेश मात्र आम्हाला वरून आदेश नाही
- अनेक शेतकरी पेरणी आणि लागवडीसाठी बँकांकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र बँक सिबिल स्कोर खराब असल्याचे सांगून शेतकऱ्यांना पिटाळून लावत आहेत. त्यावेळी शेतकरी शासनाने सिव्हिल स्कोर चेक न करण्याचा आदेश दिला असल्याचे बँकांना सांगताच बँक कर्मचारी शासनाने जरी आदेश दिला असला तरी आम्हाला वरिष्ठ पातळीवरून कोणताच आदेश नाही त्याच्यामुळे आम्ही कर्ज देऊ शकत नसल्याचे सांगत आहेत.