कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी ‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’आणि ‘मदार’ या तीन सिनेमांची निवड – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठविले जातात. मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. 2023 मधील कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नाव नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटेरी ”आणि मंगेश बदर दिग्दर्शित “मदार” सिनेमांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने चित्रपट निवडीसाठी परीक्षण समिती तयार केली होती. या तज्ज्ञ समितीमध्ये अशोक राणे, मनोज कदम, डॉ.संतोष पाठारे, सचिन परब, उन्मेष अमृते, मंगेश मर्ढेकर, मनीषा कोरडे, अनिकेत खंडागळे यांचा समावेश होता.

यासाठी एकूण ३४ मराठी चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले होते. त्यातून समितीने डिवाइन टच प्रोडक्शन निर्मित “टेरिटरी”, पायस मेडिलिंक प्रायव्हेट लिमिटेड निर्मित “या गोष्टीला नाव नाही” आणि एम. एस. फॉरमॅट फिल्म निर्मित “मदार” या चित्रपटाची निवड केलेली आहे. या तीन चित्रपटात काही तांत्रिक समस्या आल्यास टाईमप्लस प्रोडक्शनचा “गाव” आणि परफेक्ट ग्रुप निर्मित “गिरकी” हे चित्रपट पाठविण्यात येतील.

निवडण्यात आलेल्या तीन सिनेमांविषयी :

1. ह्या गोष्टीला नावच नाही

दिग्दर्शक : संदीप सावंत

डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या “मृत्यूस्पर्श” या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट. विद्यार्थीदशेतील मुकुंदला कॉलेजशिक्षणासाठी हॉस्टेलमधे रहात असताना बाहेरच्या जगाची, लहानसहान गोष्टींतून आनंद मिळविण्याच्या अनुभवांची ओळख होत जाते. पण तेव्हाच निदान झालेला जीवघेणा आजार मुकुंदला हादरवतो व तो डिप्रेशनच्या गर्तेत सापडतो. यातून त्याच्या कुटुंबाने त्याला दिलेला आधार आणि त्याने स्वतः नव्याने मिळविलेल्या आत्मविश्वासाची सकारात्मक कथा म्हणजे हा सुंदर सिनेमा.

2. टेरिटर

दिग्दर्शक : सचिन श्रीराम मुल्लेमवार

 ग्रामीण विदर्भातील व्याघ्रप्रकल्प म्हणून संरक्षित असलेल्या वन्यप्रदेशाची अनोखी मांडणी या चित्रपटात आहे. वेगवेगळ्या मानवी स्वभावछटांची व अस्तित्वासाठी लढणाऱ्या वन्यजीवांची ही कथा. जंगल, वन्यप्राणी, जंगलामधून होणारी तस्करी, जंगलावर होणारे मानवी अतिक्रमण असे गहन विषय दिग्दर्शकाने पदार्पणातच प्रभावीपणे या चित्रपटातून आपल्यासमोर आणले आहेत.

3. मदार

दिग्दर्शक: मंगेश बदर

दोन वर्षापासून पाऊस न पडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील एका खेड्यात शेतीअभावी, कामाअभावी जीवन रूक्ष झाले आहे. गावात काही मोजकीच माणसं उरली आहेत आणि तीही प्रामुख्याने वयस्कर आहेत किंवा स्त्रिया व मुले आहेत. दोन वेळच्या अन्नासाठी तरुणवर्ग शहरात जाऊन मिळेल ती नोकरी करून आपले घर चालवत आहे. अशा या साऱ्या रुक्षपणातही या गावात माणसांमधील आपसातील नात्यांचा व माणुसकीचा ओलावा अजूनही शाबित आहे. हा सिनेमा गंभीर व तीक्ष्ण वास्तववादी मांडणी करतो व सोबतच पात्रांमधील व कथानकातील आशेची पालवी मालवू देत नाही.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *