
अवकाळी पावसाने २६ गावे बाधित, ११९.४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल
बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश
सोलापूर जिल्ह्यात दि. ७ ते ९ एप्रिल या कालावधीत अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे २६ गावे बाधित झाली असून, ११९.४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. तरी बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. माळशिरस, मोहोळ, बार्शी, करमाळा, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. शासन संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने कामाला लागावे व सविस्तर अहवाल तयार करावा. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.

कृषि विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार तालुका, बाधित गावांची संख्या, बाधित क्षेत्र आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे – माळशिरस – १४ गावे, ८८ हे., ११६ शेतकरी, मोहोळ – २ गावे, २० हे., २७ बाधित शेतकरी, पंढरपूर – २ गावे, ३.६० हे., ५ शेतकरी, सांगोला – १ गाव, ३.६० हे., १ बाधित शेतकरी, बार्शी – ५ गावे, ३ हे., ५ शेतकरी, करमाळा – २ गावे, १.२० हे., २ शेतकरी.

प्राथमिक अहवालानुसार एकूण बाधित शेतकरी संख्या १५६ असून, मका, पपई, बाजरी, द्राक्षे, आंबा, केळी, दोडका, टोमॅटो ही पिके नुकसानग्रस्त झाली आहेत.