जीवनात कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करा, प्रत्येक परिक्षेत यश मिळेल – मा. सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ
जेऊर प्रतिनिधी
जीवनात कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करा, प्रत्येक परिक्षेत यश मिळेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे मा. सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ यांनी केले.जेऊर ता. करमाळा येथील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलाचे 63 वार्षिक स्नेहसंमेलन जेऊर ता. करमाळा येथे पार पडले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांंचे सत्कार व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जि. प. माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील तर व्यासपीठावर माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील, प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे मा. सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ, प्रमुख पाहुणे डाॅ सुभाष सुराणा, डाॅ सौ शारदा सुराणा,
संस्थेचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, संचालक विलास पाथ्रुडकर, युवानेते पृथ्वीराज पाटील,संजय दोशी, विवेक दोशी, सुनील बादल,सरपंच भारत साळवे, उपसरपंच अंगद गोडसे,
मा. प्रा हनूमंत धालगडे,ठोकळ सर, मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ, दिलीप देवकाते,
शेरखान नदाफ, रविंद्र देवकाते, डाॅ रितेश निर्मळ, आबासाहेब गोडसे, उमेश कांडेकर,ग्रा प सदस्य शेरखान नदाफ आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईश स्तवनाने करण्यात आली.प्रारंभी मान्यवरांचे सत्कार संपन्न झाले. यानंतर संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन संस्था सचिव प्रा अर्जूनराव सरक यांनी केले. तसेच अध्यक्ष व प्रमुख वक्ते यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ अनंत शिंगाडे, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य केशव दहिभाते
यांनी करुन दिला.बक्षीस प्राप्त विजेत्यांच्या यादीचे वाचन शिक्षक चिटणीस हनूमंत रुपनर यांनी केले.
63 व्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त पार पडलेल्या आंतर शालेय क्रिडा स्पर्धेच्या विजेत्या संघाना तसेच सन 2022 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेत विशेष गुण प्राप्त करून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यावेळी बोलताना अनिल गुंजाळ म्हणाले की लोकांना आत्मनंदाची टाळी वाजवायला भाग पाडा, प्रत्येक गोष्टीला हसतमुख होऊन सामोरे जावा. अभ्यासाची जितकी गरज आहे तितकेच कलेच महत्त्व आहे. प्रत्येकाने आपलं वेगळेपण शोधा असे सांगून भारतीय शिक्षण पद्धती मधील बदल व परिणाम या विषयी सहज भाषेत आपले विचार मांडले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील यांनी आपल्या भाषणातून भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती, सातत्य व विविध शैक्षणिक तसेच क्रिडा उपक्रमाबद्दल कौतूक केले. यावेळी त्यांनी शासनाने अशा गुणवान शिक्षण संस्थाना भरीव आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की संस्थेतील सर्वच विभागातील शिक्षक प्रामाणिकपणे दर्जेदार शिक्षण देण्याचं काम केले आहे व भविष्यात सुद्धा ही कार्यप्रणाली अशीच अविरतपणे चालू राहील. सोलापुर जिल्ह्यातील ही अग्रक्रमाने आदराने नाव घ्यावा अशी शिक्षण संस्था आहे. संस्थेचा हा नावलौकिक असाच वाढता ठेवावा ही अपेक्षा व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे डाॅ सुभाष सुराणा यांनी आपल्या भाषणातून मानवी शरीराची रचना सांगत अनेक नवलाईच्या बाबी सांगितल्या. मेंदूची कार्यक्षमता कशी वाढवावी याबाबत माहिती दिली.
प्रास्ताविक सचीव प्रा अर्जून सरक यांनी केले. सूत्रसंचालन अंगद पठाडे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार भारत प्रायमरी मुख्याध्यापक दिपक व्यवहारे यांनी मानले. स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.