करमाळा प्रतिनिधी

मागील काही दशकांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रावगाव (ता. करमाळा) येथील पंडित जवाहलाल नेहरू विद्यालय, रावगाव या शाळेला विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव (टे) या संस्थेकडून आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करमाळा येथील विकी मंगल कार्यालय याठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता.६) पार पडला. या सोहळ्यात करमाळा विधानसभेचे आमदार मा. श्री. संजयमामा शिंदे तसेच शिक्षण अधिकारी(माध्य) मा. श्री. सचिन जगताप यांच्या हस्ते रावगांव शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. विजय कोळेकर यांनी स्वीकारला. यावेळी शाळेचे शिक्षक किरण परदेशी, भाऊसाहेब सरडे, प्रताप बरडे, अंजली लांडगे, सुरेश बरडे आणि दादा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री विजय कोळेकर बोलताना म्हणाले की आमच्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. हा पुरस्कार फक्त आमच्या शाळेच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा प्रतीक नाही, तर शाळेतील प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी, आणि पालक यांच्या योगदानामुळेच आज आमची शाळा या उंचीवर पोहोचली आहे.

रावगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील विद्यार्थी शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा व स्पर्धा परीक्षांमध्ये चमकले आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून आपल्या कार्याची चमक दाखवत आहेत. शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव कामगिरी करत असून त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याची व उल्लेखनीय उपक्रमांची दखल संस्थेच्या संचालक मंडळाने घेऊन त्यांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

त्याचबरोबर रावगाव शाळेतील श्री सुरेश (अण्णा) बरडे यांना आदर्श कर्मचारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी . गणेश (भाऊ) करे-पाटील यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा, .डॉ. महेंद्र कदम प्राचार्य, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी, सामाजिक कार्यकर्ते जयवंत नलवडे गट शिक्षण अधिकारी इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *