करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकरी सभासदांचा 2 दिवशीय शेतकरी अभ्यास
दौरा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यात करमाळा तालुक्यातील सौंदे, गुळसडी, सरपडोह, शेलगाव क, चिखलठाण व तरटगाव येथील 115 स्त्री, पुरुष शेतकरी सभासदांनी सहभाग नोंदवला. या अभ्यास
दौऱ्यात शेलगाव क येथील 30 व तरटगाव येथील 16 अशा एकूण 46 महिला शेतकरी सहभागी झालेल्या होत्या.महिलांसाठी हा अभ्यास दौरा म्हणजे एक पर्वणीच ठरला.
2 दिवसाच्या या अभ्यास दौऱ्यात दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठातील सुरू असणारे नाविन्यपूर्ण प्रयोग पाहिले. विद्यापीठाअंतर्गत वेगवेगळ्या विभागांना भेटी देऊन त्यांची माहिती
जाणून घेतली. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये अग्रगण्य विद्यापीठ म्हणून राहुरी कृषी विद्यापीठाचा उल्लेख केला जातो. या विद्यापीठातील सिंचन व्यवस्थापन विभाग, अवजारे विभाग, भाजीपाला, फळबाग, नर्सरी, डेअरी फार्म, नवीन वाण संशोधन केंद्र असे वेगवेगळे विभाग जवळपास 3200 एकर क्षेत्रावर ती काम करत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांनी घेतली.
दिनांक 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी सह्याद्री फार्म नाशिक ला भेट दिली .कंपनीतील फार्मर फॅकल्टी सेंटर, माती संशोधन केंद्र, प्रक्रिया उद्योग, केळी टिशू कल्चर लॅब यांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. पाणी फाउंडेशन ने सह्याद्री कंपनी वरती बनवलेला माहितीपट सभागृहांमध्ये सर्व शेतकऱ्यांनी पाहिला. याच सभागृहात कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे सर यांनी
उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सह्याद्री कंपनीने द्राक्ष पिकावरती मूलभूत काम केले. तसेच काम केळी पिकावर ती तुम्ही करावं. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका सध्या केळी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. आपली केळी फक्त अरब राष्ट्रांपुरती मर्यादित न राहता ती युरोप आणि जपान सारख्या देशांमध्येही निर्यात झाली पाहिजे. या दृष्टीने विषविरहित गुणवत्ता पूर्ण माल तयार करणेवरती शेतकऱ्यांनी भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. भविष्यकाळात कंपनी म्हणून सह्याद्री आपल्या बरोबर कायम सहकार्याच्या भूमिकेत राहील आपण वाटचाल करावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.