करमाळा प्रतिनिधी
श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा मंगलमय वातावरणात धूमधडक्यात शाही थाटात रविवार (दि ४) रोजी सायं.६.०० या गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात तब्बल ३१ जोडपी विवाह बंधनात अडकली अशी माहिती
श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोलापूर पश्चिमचे भाजपा जि.सरचिटणीस, जिल्हा नियोजन सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे. हा विवाह सोहळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात पार पडला. यावेळी वधू वरांना शुभाशीर्वाद
देण्यासाठी गहीनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील,मकाई साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे विलासराव
घुमरे आदी उपस्थित होते. श्रीराम प्रतिष्ठानने सलग दुसऱ्या वर्षी भव्य दिव्य सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी केला. या लग्न सोहळ्यासाठी भव्य मंडप व्यवस्थेचे नियोजन केले होते. वऱ्हाडी यांना आरामात बसण्यास बैठक व्यवस्था करण्यात
आली होती. ३१ जोडपी, त्यांचे कुरवले, मामा-मामी यांच्यासाठी भव्य मजबूत स्टेज निर्माण करण्यात आला होता. विवाहस्थळी उच्च प्रतीचे साउंड सिस्टीम व्यवस्था यासह करमाळा शहरात विविध ठिकाणी वऱ्हाडीच्या स्वागतासाठी
निमंत्रण-स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच वऱ्हाडीच्या मनोरंजनासाठी पार्श्वगायक संदीप शिंदे यांचा गीत मैफलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच या सर्व सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रिनवर करण्यात आले. वरांचे परणे काढण्यासाठी भव्य तयारी करण्यात आली होती. सर्व ३१ वरासाठी घोडे, उंट यांची व्यवस्था करण्यात आली होती. बेंजो वाद्याच्या गजरात घोडे, उंट यावरती बसून फाटक्यांच्या आतिषबाजीत सर्व वरांची करमाळा शहरातून प्रमुख मार्गांवरून वरात काढण्यात आली. यावेळी वरांनी श्रीरामभक्त हनुमान यांचे दर्शनासह छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही आशीर्वाद घेतले. ३१ नव वधूवरांच्या गावाकडील वऱ्हाडी, त्यांचे सर्व पाहुणे रावळे, मित्र मंडळी, करमाळा शहर-तालुक्यातील विविध मान्यवर यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व प्रमुख मंडळीचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. या सर्वांची जेवणाची व्यवस्था विवाहस्थळी करण्यात आली असून सकाळी ११ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत सर्वासाठी जेवण्याची व्यवस्था स्वतंत्र कक्षात करण्यात आली होती. यामध्ये १५ हजार वऱ्हाडीनी भात-भाजी, पुरी,मटकी, बुंदी या जेवणाचा आस्वाद घेतला. प्रत्येक वधूवरांना संसारउपयोगी अनेक भेटवस्तु देण्यात आल्या यामध्ये सोन्याचे मणीमंगळसूत्र, भांडी सेट, नवरीला २ चांगल्या प्रतीच्या साड्या, चप्पल, मेकअप साहित्य किट, नवरदेवाला सफारी व एक ड्रेस, बूट इत्यादी भेटवस्तु देण्यात आल्या. तसेच तुळशीला पाणी घालण्यासाठी सर्व वधूच्या आईला तुळस रोपे उपलब्ध करून दिल्या होत्या. या विवाह सोहळ्यात नव वधुवरांच्या सर्व इच्छा, अपेक्षा उच्च प्रतीच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न श्रीराम प्रतिष्ठान ने केला. श्रीराम प्रतिष्ठान गेली तब्बल १३ वर्षे करमाळा शहरातील गोरगरीब गरजू वृद्ध लोकांना दोन वेळेचे ताजे भोजन देते. याबरोबरच बाहेर गावाहून करमाळा शहरात रूमवर राहून शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना रात्रीचे जेवण देण्यात येते. सांगली-कोल्हापूर पूर परिस्थिती वेळी ही प्रतिष्ठानने ३०० कुटुंबाना किराणा साहित्य देऊन मदत केली होती. आता या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे श्रीराम प्रतिष्ठान म्हणजे करमाळा तालुक्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहेत. या सर्व सामाजिक कामाबद्दल प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.
……………
श्रीराम प्रतिष्ठान आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे सामाजिक काम पार पाडत असून पुढील वर्षीही असाच सामुदायिक विवाह सोहळा पार पाडाणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आपले विवाह नोंदणी श्रीराम प्रतिष्ठान कडे करावी – गणेश चिवटे (अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान करामाळा, जि. सरचिटणीस भाजपा सोलापूर, जिल्हा नियोजन समिती सदस्य, सोलापूर)