करमाळा प्रतिनिधी
शनिवार दिनांक 3/02/24 रोजी इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथे “महिला पालक हळदी- कुंकू” समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धनश्री ताई विकास गलांडे व मनिषा ताई राजेंद्र (भाऊ) बारकुंड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महिलांनी आपल्या सुप्त गुणांचे प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी नकला, उखाणे, गाणे, भारुडे यांचे सादरीकरण केले.
खास महिलांसाठी असा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल इरा पब्लिक स्कूल चे सर्वांनी आभार मानले.
कार्यक्रम अधिक रंगतदार झाला तो महिलांसाठी आयोजित केलेल्या “रणरागिणी”, “खेळ रंगला पैठणीचा” यामध्ये संगीत खुर्ची, म्युझिक बॉल, अशा खेळांचा समावेश होता. यामध्ये सर्वच महिलांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रत्येक जनींनी आपणच ही स्पर्धा जिंकणार या जोशात सहभागी झाल्या होत्या.
शेवटी अटीतटीच्या या स्पर्धेत बाजी मारली रेश्मा धनंजय बोराडे (केडगाव) या विजेत्या महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी देऊन सत्कार करण्यात आले. तसेच कौशल्या समाधान गुंड (शेटफळ) या महिला ही उपविजेत्या ठरल्या आहेत. त्यांचे ही सर्वांनी अभिनंदन केले.
सर्व महिला पालकांना व त्यांच्या बरोबर आलेल्या लहान बालगोपाळाना अल्पोपहार देण्यात आला. सर्व महिला पालक कार्यक्रमाच्या शेवटी संगीताच्या तालावर थिरकल्या. हा कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध व सुनियोजित करण्यासाठी सर्व महिला शिक्षक व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.