करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याची जमीन अनेक वर्षापासून पडीक होती. ती दुरुस्त करण्यासाठी मी बाहेर तालुक्यातून संजयमामांना बोलावलं असून संजयमामा मुळे करमाळा तालुक्याच्या विकासाची पाळी व्यवस्थित पडत आहे. कुठेही वसाण राहत नाही अशा मिश्किल शैलीत 2024 च्या निवडणुकीत मी आमदार संजयमामा शिंदे यांचे सोबतच राहणार असून तुम्हीही त्यांना साथ द्या
असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले. निमित्त होते महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत दहिगाव उपसा सिंचन योजनेवरील बंद नलिका वितरण प्रणालिचे भूमीपूजन समारंभाचे आज (मंगळवार) दि 5 डिसेंबर रोजी जेऊर-साडे रस्ता मुख्य कॅनल लगत साडे येथे या कामाचे भूमिपूजन झाले.
यावेळी व्यासपीठावर आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, मांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुजित बागल, घोटीचे सरपंच विलास राऊत, अधीक्षक अभियंता धीरज साळी, निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर, बिटरगाव श्री येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुरूमकर, कार्यकारी
अभियंता एम. टी. जाधवर, मा.वामनदादा बदे, शेलार तात्या, मस्कर तात्या, उद्योजक दशरथ शेठ घाडगे, कल्याण बापू पवार, विलासदादा पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर मुजावर, पै. चंद्रहासबापू निमगीरे, माजी जि.प.सदस्य उध्दवदादा माळी, भरतभाऊ आवताडे, ताकमोगे सर, राजेंद्र पवार, साडे गावचे सरपंच मयुर पाटील, भोसे गावचे सरपंच भोजराज सुरवसे, गौंडरे गावचे
सरपंच सुभाष हनपुडे, नेरले गावचे सरपंच समाधान दोंड, सौंदे गावचे सरपंच जोतीराम लावंड, कंदर गावचे उपसरपंच अमर भांगे, अर्जूननगर गावचे माजी सरपंच प्रकाश थोरात, मानसिंग खंडागळे, पै.उमेश इंगळे, पै.अनिल फाटके तसेच दहिगांव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार जगताप म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण उभारणीत स्व. नामदेवराव जगताप यांचा मोठा वाटा आहे. या योजनेसाठी मी आमदार असताना प्रयत्न केले. स्व.दिगंबरराव बागल, त्यानंतर माजी आमदार शामल बागल, माजी आमदार नारायण पाटील यांनीही प्रयत्न केले. मात्र तालुक्यातील राजकीय विरोधामुळे हे काम रखडले. आमदार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे हे काम पूर्णत्वास आले असून तालुक्याचा विकास करण्यासाठी मी त्यांच्यबरोबर आहे. यापुढेही त्यांच्याबरोबर कायम राहणार असून तुम्हीही साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार जगताप यांच्या विधानामुळे करमाळा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाल्यापासून जे तर्क वितर्क लढविले जात होते त्याला आज पूर्णविराम मिळाला. यावेळी विलास काका राऊत, देविदास ताकमोगे, तानाजी मस्कर यांनीही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साखरे यांनी तर आभार डॉ. विकास वीर यांनी मानले.
चौकट –
अजितदादा मुळेच सोलापूर जिल्ह्यातील 4 उपसा सिंचन योजनांना मंजूर मिळाली – आ.संजयमामा शिंदे.
1990 ते 95 या दरम्यान उजनी धरणामध्ये अतिरिक्त 14 टीएमसी पाणी उपलब्ध करण्यामध्ये अजित दादा पवार यशस्वी झाले. त्यामुळे 90 ते 95 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा, माढा, मोहोळ व बार्शी या तालुक्यातील 4 उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली. त्यातूनच दहिगाव योजनेला मंजुरी मिळाली. 1996 ते 2023 या कालावधीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये या योजनेची कामे होत राहिली. या योजनेच्या लाभक्षेत्रामधील 10500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामासाठी आपण 101 कोटी निधी मंजूर करू शकलो. या कामामुळे 0.46 टीएमसी पाण्याची बचत होईल. त्याचा फायदा तालुक्यातील इतर गावांना पाणी देण्यासाठी होणार आहे. योजनेची सर्व कामे वर्षभरात पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.