“शिक्षण विभागाच्या लिपिकाने करमाळ्यात यावे” – शिक्षक भारतीची मागणी
करमाळा तालुक्यातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे कामकाज सोलापूर जिल्हा परिषदेमधील माध्यमिक शिक्षण विभागातून चालविले जाते. तालुक्यातील या सर्व विद्यालयांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी व वैयक्तिक कामांसाठी करमाळ्यातून सोलापूर जिल्हा परिषदेत जावे लागते. करमाळा तालुका हा सोलापूर शहरापासून सर्वात लांबचा तालुका आहे. अहमदनगर जिल्हा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या या तालुक्यातील सीमेवरील भागातील शाळा मधील कर्मचाऱ्यांना साधारणपणे 150 किलोमीटर अंतर पार करून सोलापूर येथील कार्यालयात जावे लागते. जिल्हा परिषदेमधील माध्यमिक शिक्षण विभागात करमाळा तालुक्यासाठी नेमणुकीस असणारे लिपिक यांचा फोन बंद असतो. त्यामुळे कोणताही संपर्क होऊ शकत नाही. मुख्याध्यापक लिपिक किंवा इतर कर्मचाऱ्यांना आपले काम होईल या आशेवर सोलापूरला जावे लागते. मात्र सोलापूर जिल्हा परिषदेतील कार्यालयात लिपिक भेटत नाहीत त्यांचा फोन बंद असतो. अशावेळी कर्मचारी त्यांचे काम आवक विभागात जमा करतात. मात्र आवक विभागामध्ये फाईल जमा केल्यानंतर शासन नियमाप्रमाणे आवक नंबर दिला जात नाही. त्यामुळे संबंधित कामाचा पाठपुरावा करता येत नाही. बऱ्याचदा फाईल जिल्हा परिषदेतून गहाळ होतात. नव्याने फाईल सादर करणे विषयी दबाव टाकला जातो. या सर्व कारणांमुळे कर्मचाऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. एवढ्या दूरचा प्रवास करून कोणतेच काम होत नाही या अनुभवामुळे कर्मचारी स्वतःच्या मर्जी विरुद्ध भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला बळी पडतो. आपले काम करून घेण्यासाठी तडजोडी करण्यास तयार होतो. याबाबतची गंभीर दखल घेत शिक्षक भारती संघटना करमाळा यांच्या वतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री मारुती फडके यांना दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी संघटनेद्वारे निवेदन देण्यात आले आहे की, करमाळा तालुक्यासाठी नेमणुकीस असणारे लिपिक यांना आठवड्यातून एक वेळा किंवा पंधरा दिवसातून एक वेळा करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याविषयी आदेश करावा. तसेच मोबाईल चालू ठेवण्यासाठी निर्देश द्यावेत. फाईल जमा केल्यानंतर रीतसर आवक नंबर दिला जावा.
संघटनेच्या या मागणीनुसार करमाळा तालुक्यासाठी नेमणुकीस असणारे लिपिक करमाळ्यात आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा उपस्थित राहिल्यास तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय व वैयक्तिक कामकाजासाठी सोलापूर कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागात येणाऱ्या वाईट अनुभवांचा सामना करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार नाही. करमाळा येथे लिपिक उपलब्ध करून द्यावा ही मागणी पूर्ण करावी किंवा याबाबतच्या निवेदनावर शिक्षण अधिकारी यांनी लेखी उत्तर द्यावे. असे मत शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष श्री विजयकुमार गुंड यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक भारती करमाळाचे तालुका उपाध्यक्ष श्री किशोर जाधवर सर, तालुका सचिव श्री सचिन गाडेकर सर, तालुका कोषाध्यक्ष श्री गोरख ढेरे सर उपस्थित होते.
शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करून करमाळा तालुक्याच्या कर्मचाऱ्यांच्या गैरसोयी सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असे मत शिक्षक भारती सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री सुजित कुमार काटमोरे सर यांनी व्यक्त केले. या मागणीस यश आल्यास करमाळा तालुक्यातील कर्मचाऱ्यांची सोलापूर कार्यालयात होणारी कुचंबना व येणाऱ्या वाईट अनुभवांपासून मुक्ती होईल असे मत झरे येथील नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रामहरी घाडगे सर यांनी व्यक्त केले.