शहीद जवान स्मृती सन्मान हा प्रेरणादायी उपक्रम-पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
करमाळ्यात शहीद जवानांच्या वारसांचा सन्मान
सोलापूर, दि. 12 : दिगंबरराव बागल प्रतिष्ठानने आयोजित केलेला शहीद जवान स्मृती सन्मान उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले. करमाळा येथे आयोजित कृषि प्रदर्शन व दिगंबरराव बागल जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पटांगण येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार हर्षवर्धन पाटील,संचालिका रश्मी बागल, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे,मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, विलासराव घुमरे उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे, भाजप अध्यक्ष गणेश चिवटे,शिवसेना जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शहीद जवानांचे वारस विमल वारे, प्रवीण जयहिंदे, गंगुबाई देविदास गात, सीताबाई चौधरी, अनुजा व अरविंद निलंगे, संगिता भारत काबंळे, धनाजी परबत यांचा सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संपूर्ण देश हेच शहिदांचे कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्या वारसाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. सन्मान झालेल्या सर्व वारसाच्या शासन सदैव पाठीशी आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, केंद्र सरकारने सर्वात मोठी आर्थिक तरतूद कृषि क्षेत्रासाठी केली आहे. शेती व्यवस्थेमध्ये परिवर्तन होऊन स्थैर्य आले आहे. तीन महिन्यात पाणंद, शिव रस्ते खुले करा. तसेच, मोजणीचे संपूर्ण काम विहित वेळेत पूर्ण करून नकाशे घरपोच करा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मान्यवरांनी अभिवादन केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषि महोत्सवातील विविध स्टॉलना भेट देऊन पाहणी केली.
तसेच दिगंबरराव बागल यांच्या स्मृती जागृत रहाव्यात, यासाठी उभारण्यात आलेल्या आठवणीतले मामा या कलादालनास भेट देऊन त्यांच्या आठवणीना उजाळा दिला.