माढा लोकसभा मतदारसंघात १३ नवीन पोस्ट ऑफिसेसची मंजुरी
करमाळा तालुक्यातील दोन गावांचा समावेश
करमाळा: केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघात नवीन पोस्ट ऑफिसेस सुरू करण्यासंदर्भात केलेल्या मागणीला यश मिळाले असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघात १३ नवीन पोस्ट ऑफिसेस सुरू होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.नवीन पोस्ट मंजूर केल्याबद्दल केंद्रीय संचार मंत्री मा. ज्योतिरादित्य शिंदे यांचे खासदार मोहिते पाटील यांनी आभार मानले.
नवीन मंजूर झालेली पोस्ट ऑफिसेस पुढील गावांमध्ये सुरू होणार आहेत करमाळा तालुक्यात हिवरे, आळजापूर; सांगोला तालुक्यात वाणी चिंचोली, सोनलवाडी; माढा तालुक्यात गवळेवाडी; माळशिरस तालुक्यात मारकडवाडी; पंढरपूर तालुक्यात पिराची कुरोली, करोळे तसेच माण तालुक्यात कारखेल, हिंगणी, जांभूळनी, ढाकणी व सोकासन.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा, पत्र व्यवहार, आधार लिंकिंग, विमा योजना व इतर टपाल सुविधा गावाजवळच उपलब्ध होणार आहेत.
ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तीला केंद्र सरकारच्या विविध योजना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी या पोस्ट ऑफिसेस महत्त्वाची भूमिका बजावतील असेही खा.मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.
