करमाळा प्रतिनिधी

सरकारने आश्वासन देऊन ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्यावरून राज्य सरकारने घुमजाव केले. अशा विश्वासघातकी सरकारला वठणीवर आणण्यासाठी राज्यभर सरकार विरोधात रान पेटविण्याचा इशारा माजी आमदार तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. 11 एप्रिलच्या रात्री 12 वाजता सर्व आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन केले जाणार आहे. याबाबतचे निवेदन प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, तालुका उपाध्यक्ष पप्पू ढवळे, प्रहार संघटनेचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या आंदोलनाला मुर्त रूप देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाची 30 मार्चला एक राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्ष संघटनावाढीसोबत मशाल आंदोलनावर ही चर्चा करण्यात आली होती. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी याबाबत संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले असून त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी माहिती दिली आहे.

या बैठकीला प्रहारचे राज्यभरातील प्रमुख नेते, पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख उपस्थितीत होते. शेतकर्यांच्या कर्जमाफी आंदोलनाचा पहिला टप्प्यात महात्मा फुले यांचे जयंतीचे औचित्य साधून 11 एप्रिलला रात्री राज्यातील प्रत्येक आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला महायुतीच्या नेत्यांनी, शेतकर्यांचा सात / बारा कोरा करणार असल्याचे जाहीर केले होते. या आश्वासना मुळे शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मतदान करून एकहाती सत्ता बहाल केली. मात्र सत्ता हाती येताच राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पुढील तीन वर्ष तरी, शेतकर्यांची कर्जमाफी शक्य नाही. असे सांगुन शेतकर्यांचा विश्वासघात केला. त्यामुळे राज्यभरातील शेतकर्यांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. त्याचीच दखल घेऊन माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकार विरोधात आंदोलनाचा शंखनाद केला आहे. गुढीपाडव्याला झालेल्या प्रहारच्या या बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन महायुती सत्तेत आली, सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर महायुतीची कर्जमाफीच्या बाबतीत भाषाच बदलली, हा शेतकर्यांचा महायुतीने केलेला विश्वासघातच आहे. महायुती सरकारच्या या विश्वासघातकी प्रवृत्ती विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून मशाल आंदोलन करण्यात येत आहे.

शेतकर्यांच्या कर्जमाफीसोबत शेती संबंधी इतरही प्रश्नावर राज्यव्यापी जन आंदोलन करण्याचा ही निर्णय घेण्यात आला यात शेतकर्यांचा वाढता उत्पादन खर्च कमी व्हावा. यासाठी शेतीची मजूरांकरवी होणारी सर्व कामे, रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाव्दारे करण्यात यावी. ही प्रहार जनशक्ती पक्षाची पूर्वीची मागणी रेटून धरण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला आहे. या आंदोलनाची रुपरेषा आखण्याकरिता बच्चु कडू यांनी मुंबई गाठली असल्याची माहीती आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *