
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत आदिनाथला उर्जीत अवस्थेत आणण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावरील नेतेमंडळीची भेट घेण्यास आपण कमी पडणार नसल्याची ग्वाही माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. संगोबा ता. करमाळा येथील सभेत ते बोलत होते. श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’च्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यत आला. संगोबा येथील श्री आदिनाथ महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराचा

शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जयवंतराव जगताप, विद्यमान आमदार नारायण आबा पाटील, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा दुध संघ माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंह राजेभोसले, सभापती अतुलभाऊ पाटील, जि.प. सदस्या सवितादेवी राजेभोसले, आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, डॉ. वसंत पुंडे, प्राचार्य जयप्रकाश बिले, राष्ट्रवादी तालूकाध्यक्ष संतोष वारे, विकास गलांडे, नगरसेवक संजय सावंत, अल्ताफ तांबोळी, जि.प. सदस्य बिभीषण आवटे, जालिंदर पानसरे, जि.प. सदस्य अरुण तोडकर (माळशिरस), माजी उपसभापती संजय जाधव, भाऊसाहेब फुके, डॉ. समाधान कोळेकर, आदिसह सर्व उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणातून आदिनाथ कारखान्याच्या इतिहासास उजळणी दिली. कारखान्याच्या चालू आर्थिक स्थितीबद्दल सभासदांना माहिती देऊन आगामी काळात आपण या कारखान्याच्या शासनस्तरावर असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी अविरत प्रयत्न करणार असल्याचे सांगुन या पॅनेलमधील सर्व उमेवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आल्या भाषणातून विरोधकांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला. आदिनाथ कारखान्याच्या या निवडणुकीत नव्या उमेदीचे उमेदवार या पॅनलमधून निवडणुक रिंगणात उतरले असुन या युवाशक्तीच्या उर्जेचा उपयोग आदिनाथला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी निश्चित होणार असल्याची खात्री त्यांनी बोलून दाखवली. तसेच देशभक्त स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार नामदेवराव जगताप व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हे नेहणीच जिल्हा विकासाच्या मुद्यावर मतभेद सोडुन एकत्र येत असल्याची आठवण करुन देऊन तालूक्यातील गावोगाव आता गटतट बाजुला सारुन आदिनाथ वाचवण्यासाठी मतदारांनी या पॅनलच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले. तर विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी या कारखान्याच्या उभारणीसाठी कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांनी खुप मोठा त्याग केला असुन हा कारखाना आमच्यासाठी कुटुंबातील एका घटका समान असल्याचे सांगितले. तसेच आदिनाथ साठी आपण आमदार पदाची ताकद यामागे लावणार असून वेळप्रसंगी कोणतीही राजकीय ताकद पणाला लावण्याची आपली तयारी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले. तर यावेळी देवानंद बागल व सुनील सावंत यांनी विचार मांडले. सुत्रसंचलन डॉ. समाधान कोळेकर यांनी केले तर आभार डॉ. अमोल घाडगे व रविकिरण फुके यांनी मानले. विधीज्ञ राहुल सावंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.