
करमाळा प्रतिनिधी
शेलगाव (वां) ता. करमाळा येथे केळी संशोधन केंद्र, ऊती संवर्धन – प्रयोगशाळा व केळी प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे. यावेळी मंत्रीमोहदय यांनी तपासून मंजुरी देण्यात यावी असे संबंधितांना निर्देश दिले.

करमाळा तालुक्यामध्ये केळी पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यात केळी पिकासाठी असणारे पोषक वातावरण आणि मोठ्या प्रमाणात वाढत असलेले केळी पिकाखालील क्षेत्र याचा विचार करता करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. करमाळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम केळीचे उत्पादन होऊन आखाती देशाबरोबरच युरोपीयन देशमध्येही केळीची निर्यात होत आहे. करमाळा तालुक्यामध्ये सन २०२१-२२ मध्ये ६७३१ हेक्टर व सन २०२२-२३ मध्ये ६९७८ हेक्टर व सन २०२३-२४ मध्ये ७३०० हेक्टर एवढ्या क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केल्याचे कृषी विभागाकडे नमूद असून सरासरी उत्पादकता ६९ टन प्रति हेक्टर आहे. करमाळा तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेज व पॅक हाऊसची संख्या ०९ इतकी असून त्याची साठवण क्षमता २५००० मेट्रीक टन आहे. करमाळा तालुक्यातून मौजे कंदर, वाशिंबे, वरकटणे, जेऊर येथून ८००० कंटेनरमधून १,६०,००० मे. टन वजनाच्या केळीची निर्यात झालेली आहे. तसेच केळी फळावर प्रक्रिया करून वेफर्ससह इतर उत्पादन काढली जातात.

परंतु केळी या पिकासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याने कुशल मजुरासाठी प्रशिक्षण केंद्र, मृदा व जलपरीक्षण केंद्र, खत तपासणी प्रयोगशाळा, नवनवीन वाणाची निर्मिती व दर्जेदार रोपांची निर्मिती होण्यासाठी केळी संशोधन केंद्राची व ऊती संवर्धन प्रयोगशाळेची आवश्यकता आहे.
तरी मौजे शेलगाव (वां) ता. करमाळा येथे केळी संशोधन केंद्र व ऊती संवर्धन प्रयोगशाळेची उभारण्यास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी कृषिमंत्री यांच्याकडे केली.