
जीबीएस(गुईलेन बॅरे सिंड्रोम) आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जीबीएस आजाराच्या उपचारासाठी प्रतिबंधात्मक औषधे तसेच इंडक्शन स्टडी मशिनरी साठी दोन कोटीचा निधी
जीबीएस आजाराबाबत आरोग्य यंत्रणेने तात्काळ जनजागृती मोहीम राबवून उपाययोजनांची माहिती द्यावी

सोलापूर, दिनांक 27(जिमाका):- जिल्ह्याच्या ग्रामीण, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांकडे गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराचा रुग्ण आढळल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ संबंधित शासकीय आरोग्य यंत्रणेने घेऊन त्याचा दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या आरोग्य यंत्रणेला खाजगी रुग्णालयातील जीबीएस आजाराच्या रुग्णांची दैनंदिन माहिती घेण्याबाबत करण्याचे निर्देश दिले तसेच नगरपालिका क्षेत्रातील रुग्णांच्या माहितीसाठी जिल्हा शिल्लक चिकित्सक त्यांच्या अंतर्गत च्या वैद्यकीय अधीक्षक यांनी नगरपालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांच्या बैठका घेऊन त्यांना या आजाराबाबत मार्गदर्शन करावे तसेच त्यांच्याकडून दैनंदिन रिपोर्ट घ्यावा तर सोलापूर शहरातील जीबीएस आजारांच्या रुग्णाबाबत महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांच्या स्वतंत्र बैठक आयोजित करून त्यांना या आजाराच्या अनुषंगाने माहिती देऊन त्यांच्याकडून दैनंदिन अहवाल मागून घ्यावा उपरोक्त सर्व शासकीय यंत्रणांनी दैनंदिन अहवाल प्राप्त करून तो अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा. जे खाजगी रुग्णालय जीबीएस आजाराच्या रुग्णांची माहिती देणार नाहीत अशा रुग्णालयावर विहित नियमावलीनुसार कारवाई करावी, असे त्यांनी सुचित केले.
ग्रामीण भागातील मोठ्या गावामध्ये जिल्हा परिषदेने पाणी नमुन्याची तपासणी करावी तसेच जीबीएस आजाराच्या लक्षणांच्या अनुषंगाने सर्वेक्षण करावे. हीच मोहीम नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात संबंधित यंत्रणांनी राबवावी. तसेच या आजाराच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना माहिती हवी यासाठी ग्रामीण नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात होर्डिंग बॅनर जिंगल याद्वारे उपायोजना प्रतिबंधात्मक कारवाई तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी या अनुषंगाने जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, हा आजार संसर्गजन्य नाही यामध्ये योग्य काळजी व दक्षता घ्यावी. दूषित पाणी पिऊ नये व कच्चे मास खाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.
अन्न औषध प्रशासनाने जिल्ह्यातील हॉटेलमधील पाणी व अन्नाचे नमुने घ्यावेत. जे हॉटेल चालक स्वच्छता ठेवणार नाहीत अशा हॉटेल चालकाना नोटीस द्याव्यात. पाणीपुरी व अन्य तत्सम फूटपाथ वरील पदार्थांचेही नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. कुठेही अस्वच्छता व दूषित पाणी आढळल्यास त्यांना नोटीस देऊन पुढील कार्यवाही प्रस्तावित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या खाजगी रुग्णालयांनी जीबीएस आजाराच्या रुग्णावर योजनेअंतर्गत मोफत उपचार करावे. जे रुग्णालये असे करणार नाहीत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या आजाराच्या उपचारासाठी प्रतिबंधात्मक औषधे तसेच इंडक्शन स्टडी साठी आवश्यक मशिनरी घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार तात्काळ दोन कोटीचा निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात येणार आहे. तसेच यासाठी अतिरिक्त निधी आवश्यक असेल तोही उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
जीबीएस आजाराचे पाच रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळलेले असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून उर्वरित चार रुग्ण हे उपचार घेत असून हे चारही रुग्ण सोलापूर जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती आरोग्य यंत्रणा कडून यावेळी देण्यात आली. तसेच या आजाराच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून शासकीय रुग्णालयामध्ये आवश्यक राखीव बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.