करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ज्ञाची नेमणूक नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूर अथवा अन्यत्र पाठवले जाते. त्यामुळे येथे भुलतज्ज्ञाची त्वरित नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या विषयी आमदार शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असं म्हंटलं आहे की, आपल्या प्रयत्नांमुळे या रुग्णालयात महिलांसाठी मोफत सिझरची सुविधा सुरू झाली, परंतु कायमस्वरूपी भुलतज्ज्ञ नियुक्त नसल्याने ही सुविधा मिळण्यामध्ये बऱ्याच वेळा अडचण निर्माण होते आहे तेव्हा कायमस्वरूपी भुलतज्ज्ञ नियुक्ती चा प्रश्न आमदार शिंदे यांनी लक्ष घालून त्वरित सोडवावा असे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देताना सुजित बागल, किरण फुंदे, अशपाक जमादार, आशिष गायकवाड, भरत आवताडे, ऍड.अजित विघ्ने, स्वप्निल पाडुळे, महादेव फंड आदी उपस्थित होते.
……………….
बदली प्रक्रियेत निश्चितच कायमस्वरूपी भूलतज्ञ मिळेल…
करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना सर्व सुख सुविधा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्नशील असून याबाबतीमध्ये माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सध्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची नियमित बदली प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये उपजिल्हा रुग्णालय करमाळा साठी निश्चितच कायमस्वरूपी भुलतज्ञ मिळेल. याविषयी वरिष्ठ स्तरावरती माझे बोलणे झाले आहे.