करमाळा प्रतिनिधी
न्यू इरा पब्लिक स्कूल मध्ये पालक शिक्षक सभा उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाली. न्यू इरा पब्लिक स्कूल एक मोठी शाळा असल्यामुळे एकाच वेळी सर्व वर्गाच्या पालकांना बोलावून पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. विभागानुसार त्या त्या वर्गातल्या वर्ग शिक्षकांना आणि विषय शिक्षकांना कामाचे नियोजन देण्यात आले. या सर्व सभेचे नियोजन शालेय वेळेत सकाळी 10 ते 12 या दरम्यान करण्यात आले. यावेळी सर्व पालकांच्या समस्यांचे व शंकांचे निरसन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी, अभ्यासाची वेळ, आहार, आरोग्य, शिस्त, संस्कार, दहावीच्या उंबरठ्यावर, नवीन शैक्षणिक धोरण इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या निमित्ताने पालक शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद वाढीस लागल्याचे पहावयास मिळाले. सर्व वर्ग शिक्षकानी पालकांच्या शंकांचे निरसन केले व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी अनेक सूचना केल्या.
अनेक पालकांनी चर्चेत सहभाग घेतला आणि शाळेमध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण बाबींचा आणि उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. शाळेने विविध उपक्रमामध्ये आणि शालेय गुणवत्तेत जी दिमाखदार कामगिरी केली आहे, त्याबद्दल पालकांनी संस्थेचे आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. पालक शिक्षक सभा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यपक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.