सोलापूर : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत 2021 व 2022 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथामधून ग्रंथ निवड समितीने शिफारस केलेल्या मराठी ग्रंथांची यादी प्रसिध्द करण्यात आली असून या शासनमान्य ग्र्रंथ यादीत उज्ज्वलकुमार माने लिखित अखंड होळकरशाही या ग्रंथाचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रंथ निवड समितीने शिफारस केलेल्या 2021 मध्ये प्रकाशन ग्रंथ यादीमध्ये यादी क्र. 1950 वर पुणे येथील यशोदीप पब्लिकेशन्सच्या अखंड होळकरशाही या ग्रंथाचा समावेश आहे. मराठा साम्राज्य, अखंड होळकरशाही, पेशवाई, शिंदे, भोसले इत्यादी घराण्याचा इतिहास संशोधनात्मक या ग्रंथात मांडण्यात आला आहे.
ग्रंथालय संचालक तथा ग्रंथ निवड समितीचे सदस्य सचिव अशोक गाडेकर यांनी यादीचा प्रस्ताव प्रसिध्द केला असून त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व नोंदणाकृत सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथालयांना मिळणाऱ्या अनुदानाच्या 25 टक्के रक्कम ग्रंथालय संचालनालयाने प्रकाशित केलेल्या ग्रंथ निवड यादीतील ग्रंथ खरेदी करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी नियमानुसार खरेदी करावी असे आदेशही या प्रस्तावात देण्यात आले आहेत.