जिल्ह्यात दहा ते बारा ठिकाणी डाळिंब मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार
सोलापूर, दिनांक 2 जिमाका:- डाळिंब पीक हे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत योग्य पीक असून याला खूप मोठे भवितव्य आहे. शासन व प्रशासन या पिकाचे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे, शासन व प्रशासन ह्या पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के पाठबळ देणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब पीक लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथे कृषी विभाग व गौडवाडी डाळिंब उत्पादक शेतकरी संघ यांच्यावतीने शाश्वत निर्यातक्षम डाळिंब उत्पादन कार्यशाळा व डाळिंब प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठे, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, एनआरसीपी चे शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ, डॉक्टर सोमनाथ पोखरे, डॉक्टर प्रशांत कुंभार यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी संघाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचे उत्पादन घेण्यासाठी कृषी विभाग यांच्याकडून सविस्तर माहिती घ्यावी. हे पीक खूप चांगले असून या पिकासाठी सोलापूरची जमीन व वातावरण ही पोषक आहे, हे पीक निर्यातक्षम असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळणार आहे. या डाळिंब पिकाविषयी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कृषी विभाग व आत्मा यांच्याकडून जवळपास दहा ते बारा ठिकाणी डाळिंब मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळासाठी जिल्हा नियोजन समिती मधून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सर्व संबंधित अधिकारी यांनी आण्णा गडदे व नाना माळी यांचे निर्यातक्षम डाळिंब प्लॉटला भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. गौडवाडी मधील डाळिंबाचे काम पाहुन समाधान व्यक्त केले व उपस्थित शेतकऱ्यांना डाळिंब पीक घेण्याबाबत मार्गदर्शन तर केलेच परंतु आपले नातेवाईक व मित्र शेतकरी बंधूंना हे पीक घेण्याबाबत आग्रह करावा असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी डाळिंब पिकाचे महत्व सांगून लागवड पद्धत तसेच कोणत्या जातीचे पीक घ्यायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर NRCP चे शास्त्रज्ञ डाॕ.संग्राम धुमाळ व डाॕ. सोमनाथ पोखरे व प्रा.प्रशांत कुंभार यांनी डाळिंब पिकाविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.
या डाळिंब कार्यशाळेस प्रकल्प संचालक आत्मा शितल चव्हाण, उपसंचालक मदन मुकणे, उपविभागीय कृषि अधिकारी बाळासाहेब लांडगे, तहसिलदार संतोष कणसे, तालुका कृषि अधिकारी पंढरपुर सुर्यकांत मोरे, डाळिंब बागायतदार प्रविण माने उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केले तर गौडवाडीमधील डाळिंब लागवडीविषयी माहिती उदय पंडितनाना माळी यांनी दिली.