करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील रुग्णांच्या उपचारा करिता शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून लाखो रुपये उपलब्ध करून देत असल्याबद्दल युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी सावंत यांचे आभार मानले आहे.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कार्यक्षम व प्रभावी नेतृत्व लाभलेले मंत्री असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणावर मिटली आहे. करमाळा तालुक्यातील रुग्णांची सुद्धा पैशा अभावी हेळसांड होऊ नये म्हणून आमची टीम कार्यरत असून त्यामध्ये युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे व शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड व इतर पदाधिकाऱ्यांचे भरीव योगदान आहे. शिवाजी सावंत यांच्या एका फोनवर रुग्णांना सर्वोतोपरी मदत होत असल्याने करमाळा तालुक्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. आजही युवा सेना २४ तास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असून केलेल्या मदतीबाबत कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता कार्य करीत असल्याने सर्वसामान्य जनतेतून शिवाजी सावंत यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. तसेच एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळता कामा नये या धोरणाने आमचा पक्ष शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
शेवटी बोलताना गायकवाड म्हणाले की, सावंत बंधूंच्या उत्तम अशा कार्यप्रणालीने अनेक युवक प्रेरित होऊन पक्षामध्ये येण्यास उत्सुक आहेत. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश करून करमाळा तालुका वासियांच्या विविध भागातील अडचणी दूर करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.