
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. 2 या शाळेत मुलांना पंचपक्वान्नाचे जेवण देऊन शिक्षण सप्ताहाची सांगता करण्यात आली.
दिनांक 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या दरम्यान शाळेत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दररोज वेगवेगळ्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.

यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस आणि समुदाय सहभाग दिवस असे वेगवेगळे दिवस आणि त्या दिवसाच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम घेण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य आणि मूलभूत कौशल्याचे ज्ञान देणाऱ्या या वेगवेगळ्या उपक्रमांचे प्रभावीरीत्या आयोजन करण्यात आले.

शेवटच्या दिवशी लोकसहभागातून मुलांना गोड जेवण देण्याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी आवाहन केले होते आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देत खातगाव नं.2 शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना पंचपक्वान्न देण्याचे नियोजन करण्याचे ठरवले आणि त्याला सहशिक्षक किरण जोगदंड आणि ग्रामस्थांनीही साथ दिली. लोकसहभागातून मुलांसाठी गुलाब जामुन, लाडू , पुरी, भाजी, शेव चिवडा, पापड असे पंचपक्वान्नयुक्त जेवण दिले. नियोजनबद्ध जेवणाचे आयोजन केल्याने मुलांनीही त्यावर मनसोक्तताव मारला .

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संतोष झेंडे, समाधान तानवडे, अमित पाटील, शंकर रणसिंग, आनंदराव कोकरे, भारत लिंबोरे, विकास कुंढारे, वैजीनाथ कुंढारे , सरपंच अविनाश मोरे यांनी अनमोल सहकार्य केले.
लहान शाळा असून देखील ग्रामस्थांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना असे पंचपकवान आयुक्त जेवण दिल्याबद्दल करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, शि.वि.अ.नितीन कदम, केंद्रप्रमुख महावीर गोरे यांनी सर्व ग्रामस्थांचे आणि मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे व सहशिक्षक किरण जोगदंड यांचे भरभरून कौतुक केले.