करमाळा (प्रतिनिधी) – राजकारण व निवडणुकांमधील प्रस्थापितांची घराणेशाही व मक्तेदारी संपविण्यासाठी आणि सामान्य जनतेचे खरे प्रतिनिधित्व करण्यासाठी यावेळी आपण माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक
लढवत असल्याचे प्रतिपादन आपली भूमिका स्पष्ट करत असताना येथील उमेदवार विनोद दिलीप सितापुरे (दाळवाले) यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. याविषयी पुढे बोलताना सितापुरे म्हणाले की, आपल्या देशात लोकशाही ही नावालाच उरलेली
असून लोकशाहीच्या नावाखाली ठराविक घराण्यांची राजकीय घराणेशाही व मक्तेदारी निर्माण झाली असून सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि या पैश्याच्या माध्यमातून पुन्हा सत्ता ! हे सूत्र निर्माण झाले असल्याने खर्या अर्थाने लायक, सक्षम,
शिक्षित व सर्वसामान्य माणसाला निवडणूक लढविणे कठीण झालेले आहे. हा ट्रेंड मोडून काढण्यासाठी व सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण सामान्य कुटुंबातून पुढे येऊन धाडसाने व स्वबळावर ही निवडणूक लढवीत आहोत.
व्यवसायाने व्यापारी व शेतकरी असलेल्या सितापुरे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी जरी नसली तरी त्यांना सुरुवातीपासून समाजसेवेचा, समाजकार्याचा छंद आहे. याविषयी पुढे बोलताना सितापुरे हे म्हणाले, मतदारांनी आपल्या तळमळीची दाखल घेऊन आपल्याला संधी दिली तर आपण माढा मतदार संघातील शिक्षण, औद्योगिकीकरण, सिंचन, बेरोजगारांना रोजगार, रस्ते व दळणवळण, रेल्वेचे रेंगाळलेले प्रकल्प आदी सर्व क्षेत्रातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी अहोरात्र कटिबद्ध राहणार आहोत. आपण मुळचे करमाळा मतदार संघातील रहिवासी असून करमाळा विधानसभा मतदारसंघातून आजपर्यंत पाच वेळा अपक्ष आमदार निवडून आलेले आहेत. ही परंपरा आपण यावेळी अपक्ष म्हणून निवडून येऊन माढा मतदारसंघात सुरु करण्याचा आत्मविश्वास आपल्यला आहे. आपल्या उमेदवारीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात असून मतदारांना यावेळी आपल्या रूपाने हक्काचा सर्वसामान्य असा खासदार निवडून द्यायचा असल्याचे मतदारांमधून बोलले जात आहे. आपल्याला सफरचंद हे शुभ असे निवडणूक चिन्ह मिळालेले असल्याने आपला विजय निश्चित असल्याची ग्वाही यावेळी बोलताना सितापुरे यांनी दिली आहे.