करमाळा प्रतिनिधी
उजनी बॅकवाॅटर परिसरातील तिनही बाजूने साधारण ३० किलोमीटर पाण्याने वेढलेल्या ३५०० एकर कुर्मग्राम (कुगाव), चिखलठाण पंचक्रोशीत पर्यटनाला प्रचंड मोठा वाव आहे. या परिसरातील कुगाव, चिखलठाण १ व चिखलठाण २ या गावातील
बेरोजगार युवक-युवतींना गावातच रोजगार उपलब्ध होइल. सदर परिसराचा महाराष्ट्रातील कोकण, भारतातील गोवा किंवा केरळ प्रमाणे विकास करणे गरजेचे आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली पाहिजेत. या परिसराला प्रचंड मोठा पौराणिक वारसा लाभला आहे.
भीमामहात्म्य या पौराणिक ग्रंथातील अध्याय ३३ नुसार हनुमानाचा जन्म याच परिसरात झाला असून भीमामहात्म्य या पौराणिक ग्रंथातील अध्याय ३३ मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे
यांनी हनुमान जन्मभूमी कुगाव येथे भुईकोट किल्ला बांधला आहे. सध्या या ठिकाणाला उजनी धरणाच्या निर्मितीनंतर जलसमाधी लाभली आहे परंतु उजनी बॅकवाॅटर परिसरातील पाणी उथळ असताना हा किल्ला उघडा पडतो त्यावेळी
महाराष्ट्रातील शिवप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेटी देतात. इंदापूर शहरातून कुगाव परिसरात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिरसोडी-कुगाव पुल विकसीत करणेबाबत पुढाकार घेतला आहे. तसेच प्रस्तावीत जलहवाई सेवा लवकरच याच परिसरातील कालठण ता. इंदापूर या ठिकाणी सुरू होणार आहे. पर्यटन वाढीबाबत चालना मिळवून देण्यासाठी गंगावळण ता. इंदापूर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अद्ययावत गेस्ट हाऊसचे काम पुर्ण केले जात आहे.
हनुमान जन्मभूमीतील बेरोजगार युवकांनी हनुमान जन्मभूमीत येण्यासाठी खाजगी स्तरावर साधारण १२ बोटींगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या गंगावळण, कळाशी, कालठण, शिरसोडी व पडस्थळ या ठिकाणाहून या परिसरातील येण्यासाठी बोटींगची व्यवस्था आहे. बोटींगच्या माध्यमातून दरवर्षी साधारण दोन कोटी च्या आसपास उलाढाल होत आहे. येत्या काळात या परिसरात पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व स्थानिक बेरोजगार युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होइल – तेजस्विनी दयानंद कोकरे (माजी सरपंच ग्रामपंचायत कुगाव ता. करमाळा जि. सोलापूर)